मुंबई : दादर पूर्व व पश्चिमेचा भाग म्हटलं तर नेहमीच वर्दळ असते. तर दादर पूर्वेला टॅक्सी, खासगी वाहने, बेस्ट बस, अनधिकृत टॅक्सी सेवामुळे कोंडीतील प्रवास करावा लागतो. त्यामुळे दादर रेल्वे स्थानक पूर्वेकडील परिसर कोंडीमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिका, स्थानिक लोकप्रतिनिधी, वाहतूक पोलीस आणि मध्य रेल्वे प्रशासनाच्या मदतीने विविध उपाययोजना करण्याचे ठरले आहे. दादर पूर्वेला स्थानक परिसरात टॅक्सी व बेस्ट बसेससाठी स्वतंत्र मार्गीका करतानाच टॅक्सीसाठी स्वतंत्र स्टॅन्ड उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
मुंबईच्या मध्यभागी असलेले दादर हे स्थानक वर्षाचे बारामाही गजबजलेले. दादर रेल्वे स्थानक (पूर्व) आणि आसपासच्या परिसराची नुकतीच संबंधित सर्व यंत्रणांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी प्रत्यक्ष पाहणी केली. एफ उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त, माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, माटुंगा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, बेस्ट बस वाहतूक व नियोजन विभागाचे प्रमुख तसेच दादर रेल्वे स्थानक व्यवस्थापक आणि शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवक उपस्थित होते.
दादर रेल्वे स्थानकातून दररोज मोठ्या संख्येने प्रवाशांची ये-जा होते. पूर्वेला स्थानकाबाहेर पडताच नागरिकांना वाहतूक कोंडी, अनधिकृत पार्किंग, रिक्षा-टॅक्सी व बसमुळे अडथळे निर्माण होतात. पादचाऱ्यांना चालताही येत नाही. ही स्थिती पाहता होणारा त्रास तसेच परिसरातील गर्दी व सुरक्षिततेशी संबंधित समस्या यांचा प्रत्यक्ष आढावा संबंधित यंत्रणा व लोकप्रतिनिधी यांनी घेतला.
मुंबईबाहेरून दादर येथे येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित व योग्य निवारा (शेड), सुलभ पादचारी मार्ग, शिस्तबद्ध रिक्षा-टॅक्सी व बेस्ट बस व्यवस्था आणि अधिक चांगली दळणवळणाची सेवा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चाही झाली. दादर रेल्वे स्थानक पूर्वेला स्वामीनारायण मंदिरासमोर मोठया प्रमाणात टॅक्सीची ये-जा सुरू असते. त्यामुळे टॅक्सी, खासगी वाहनांना शिस्त न राहिल्याने सुरळीत वाहतुकीचा बोजवारा उडालेला दिसतो. त्यामुळे टॅक्सीसाठी स्वतंत्र मार्गीका आणि स्टॅन्ड करण्याचे नियोजन असल्याची माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली. या स्थानकाबाहेरच आठ टॅक्सी उभ्या राहतील असा लहानसा अनधिकृत स्टॅन्ड उभारला असून लवकरच तो हटवण्यात येणार आहे. तसेच बेस्ट बससाठीही स्वतंत्र मार्ग करण्याचे विचाराधीन आहे. पूर्वेला रेल्वे स्थानकाबाहेर येणाऱ्या प्रवाशांसाठी ऊन, पावसापासून बचाव करण्यासाठी शेड उभारणी आणि आसनव्यवस्था करण्याचे नियोजन आहे. याशिवाय पूर्वेला काही गाळेधारकांनी अनधिकृतपणे विस्तार केला असून त्यावरही कारवाई करून जागा मोकळी केली जाणार आहे.
दादर रेल्वे स्थानक पूर्व परिसर अधिक सुरक्षित, सुटसुटीत आणि प्रवासी-स्नेही करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न आहे. यासाठी आम्ही महापालिका सहाय्यक आयुक्त, रेल्वे आणि वाहतूक पोलिसांशी समन्वयाने दादर पूर्वेला विविध उपाययोजनाचे नियोजन करणार आहोत. टॅक्सी स्टॅन्ड, टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्ग इत्यादी सुविधा उभारण्याचे नियोजन असल्याचे मुंबई महापालिकेतील शिंदे सेनेचे गटनेते अमय घोले यांनी सांगितले.