Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

मुंबईत दहीहंडी उत्सवादरम्यान २२ गोविंदा जखमी झाले असल्याची माहिती समोर येत आहे.

Mayuri Gawade

मुंबई : मुंबईत दहीहंडीचा उत्साह शिगेला पोहोचला असून, चौकाचौकात गोविंदा पथकांचा जल्लोष, ढोल-ताशांचा गजर आणि थरावर थर रचणाऱ्या गोविंदांचा थरार पाहायला मिळत आहे. मात्र, या उत्सवी वातावरणाला काही ठिकाणी अपघातांचं गालबोट लागलं आहे. दहीहंडी फोडण्याच्या प्रयत्नात मुंबई आणि उपनगरांत एकूण २२ गोविंदा जखमी झाले आहेत.

कृष्ण जन्माष्टमीनिमित्त मुंबईसह राज्यभर दहीहंडी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. उंचावर बांधलेली हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांकडून मानवी मनोरे रचले जात आहेत. मात्र, काही ठिकाणी थर कोसळणे किंवा तोल जाण्याच्या घटनांमुळे गोविंदांना दुखापत झाल्याचं समोर आलं आहे.

मुंबईत २२ गोविंदा जखमी

मुंबई महापालिकेच्या माहितीनुसार, शनिवारी (दि.०५) दुपारपर्यंत मुंबई आणि उपनगरांत दहीहंडी उत्सवादरम्यान २२ गोविंदा जखमी झाले. शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेल्या २० जखमींना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला.

पूर्व उपनगरातील एका जखमी गोविंदालाही उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. पश्चिम उपनगरातील एक गोविंदा मात्र सध्या उपचाराधीन आहे.

जखमी गोविंदांसाठी १०० हून अधिक बेड सज्ज

दहीहंडीच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने जखमी गोविंदांच्या उपचारासाठी विशेष व्यवस्था केली आहे. पालिकेची १६ उपनगरीय रुग्णालयं तसेच सायनमधील लोकमान्य टिळक महापालिका रुग्णालय, परळमधील केईएम आणि मुंबई सेंट्रलमधील नायर रुग्णालयात मिळून १०० हून अधिक बेड राखीव ठेवण्यात आले आहेत.

शहरातील संवेदनशील भागांत पोलिसांनीही बंदोबस्त वाढवला असून, गर्दीच्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

गेल्या वर्षी ३१८ गोविंदा जखमी

दहीहंडीच्या उत्सवात थर रचताना गोविंदा जखमी होण्याच्या घटना यापूर्वीही मोठ्या प्रमाणावर घडल्या आहेत. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२२ मध्ये २०० हून अधिक, २०२४ मध्ये २४५ तर २०२५ मध्ये तब्बल ३१८ गोविंदा जखमी झाले होते. मागील वर्षांच्या या आकडेवारीच्या पार्श्वभूमीवर यंदा महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेकडून आधीच विशेष पूर्वतयारी करण्यात आली आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये महिलेचा मृत्यू

दरम्यान, शुक्रवारी (दि.०४) पुणे जिल्ह्यातील जुन्या सांगवी परिसरात दहीहंडी कार्यक्रमानंतर उभारलेली लोखंडी संरचना उतरवताना झालेल्या दुर्घटनेत ४५ वर्षीय सलमा सलाउद्दीन पठाण यांचा मृत्यू झाला. लोखंडी संरचनेचा जड भाग त्यांच्या डोक्यावर कोसळल्याने त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

दहीहंडीचा उत्सव जल्लोषात सुरू असतानाच मुंबई आणि पुण्यातून समोर आलेल्या या घटनांमुळे सुरक्षेचा मुद्दाही पुन्हा चर्चेत आला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

VIDEO : अंधारात वळणावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव कारची धडक; इंजिनिअरिंगच्या ८ विद्यार्थ्यांचा मृत्यू, दरवाजे कापून काढले मृतदेह

Pune : दहीहंडी कार्यक्रमानंतर मोठी दुर्घटना; लोखंडी सांगाडा कोसळून ४५ वर्षीय महिलेचा मृत्यू

Thane : गणेशोत्सव, नवरात्रीला मंडप भाडेमाफीचा प्रस्ताव; महासभेच्या निर्णयाकडे मंडळांचे लक्ष

मेगा IPO येतोय...; दशकाची प्रतीक्षा अखेर संपली, NSE च्या ३० हजार कोटींच्या आयपीओला सेबीची मंजुरी

स्क्रॅप रिक्षांवर होणार कारवाई; ५ ऑक्टोबरपर्यंत विशेष मोहीम, नियमबाह्य रिक्षा रडारवर