मुंबई : दहिसर परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीनेच स्वतःच्या पत्नीची आणि अल्पवयीन मुलीची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी ३६ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे.
माहितीनुसार, हा प्रकार रविवारी (दि.३०) मध्यरात्री घडला असून आरोपीचं नाव हनुमंत सोनवल असं आहे. त्याने आपल्या १४ वर्षांची मुलगी प्रियांशी हिच्या मानेवर ब्लेडने वार केल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात मुलीच्या मानेवर पाच टाके पडले असून प्रियांशीच्या जबाबावरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून सोमवारी आरोपीला न्यायालयात हजर केले. त्याला ३ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
विवाहबाह्य संबंधांचा आरोप, घटस्फ्टोटाचा अर्ज, शिवीगाळ अन् मारहाण
प्रियांशी आपल्या पालकांसोबत दहिसरमध्ये राहते. आई राजश्री ही डायमंड कंपनीत काम करते, तर हनुमंत हा पेस्ट कंट्रोल एजन्सीत नोकरी करतो. राजश्री यांनी याआधीच सतत होणाऱ्या मारहाणीमुळे आणि छळामुळे वांद्रे येथील न्यायालयात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. मुलीनेही पोलिसांना दिलेल्या माहितीत, वडील दारूच्या नशेत वारंवार आईला मारहाण करत असल्याचं सांगितलं. शनिवारी, राजश्री आणि प्रियांशी आईचा वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेल्या होत्या. वाढदिवस साजरा करून घरी परतल्या. त्यावेळी हनुमंतने राजश्रीच्या नातेवाईकांना फोन लावून विवाहबाह्य संबंधांचा आळ घेतला. तिला शिवीगाळ करीत धमकावलेही. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही घरात तणाव सुरूच होता. रविवारी राजश्री घटस्फोटाबाबत माहिती घेण्यासाठी वकिलांना भेटायला नालासोपाऱ्याला गेली. घरी परतल्यावर पुन्हा जोरदार वाद झाला आणि या वादात तिने घर विकून मुलीसोबत पुण्याला जाण्याचा विचार असल्याचे त्याला सांगितले.
माय-लेकींवर झोपेतच हल्ला
वादानंतर हनुमंत रात्री १० वाजताच्या सुमारास घराबाहेर पडला. त्यानंतर आई-मुलगी दोघी झोपायला गेल्या. मध्यरात्री प्रियांशीला मानेत तीव्र वेदना जाणवल्याने ती जागी झाली आणि रक्तस्त्राव होत असल्याचं तिला दिसलं. त्याचवेळी आईच्या बाजूला हातात रक्ताने माखलेलं ब्लेड घेऊन उभ्या असलेल्या पित्यावर तिची नजर गेली आणि ती किंचाळली. तिच्या आवाजामुळे आईसह शेजारीपाजारीही जमा झाले आणि हनुमंतला तत्काळा घराबाहेर हाकलून दिले. जखमी प्रियांशीला तातडीने शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. वैद्यकीय तपासणीनंतर पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आणि आरोपीला अटक केली.
गुन्हा दाखल, तपास सुरू
दहिसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांनी सांगितले की, हनुमंतवर खूनाच्या प्रयत्नासह घरगुती हिंसाचाराचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का, याचा तपास सुरू आहे.