मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात रिपरिप पाऊस पडत आहे. त्यामुळे सात धरणांत एकूण ९८.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा धरणांतील पाणीसाठ्यात संथ गतीने वाढ होत आहे.
मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून दरदिवशी ३९०० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. या सातही धरणांची पाणी साठवण क्षमता १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर इतकी असून गुरुवारी या धरणांमध्ये १४ लाख २१ हजार ०८५ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. मे आणि जून महिन्यांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणक्षेत्रातील पाणीसाठा ५० टक्क्यांवर पोहोचला होता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून अधूनमधून बरसत आहे. त्यामुळे धरणसाठ्यात यंदा संथगतीने वाढ होत आहे. मागील वर्षी याच दिवशी धरणसाठ्यात ९८.२१ टक्के पाणीसाठा होता, तर यावर्षी ९८.१८ टक्के पाणीसाठा जमा आहे.
ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत ४ धरणे ओसंडून वाहू लागली होती. सध्या ३ तलाव भरण्याच्या मार्गावर आहेत. मध्य वैतरणा आणि भातसा धरण लवकरच ओव्हरफ्लो होऊन ओसंडून वाहू लागतील, अशी माहिती जलविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
दरम्यान मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांत मिळून ९८.१८ टक्के जलसाठा जमा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची पाणी चिंता आता मिटली आहे. राज्यात आणखी काही दिवस पाऊस पडणे अपेक्षित असल्याने या जलसाठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विहार, तुलसी ओव्हरफ्लो
मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार गुरुवारी धरणांत ९८.१८ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. सद्यस्थितीत अप्पर वैतरणामध्ये ९७.८८ टक्के, मोडकसागरमध्ये ९९.९९, तानसामध्ये ९८.३३ टक्के, मध्य वैतरणामध्ये ९८.११, भातसामध्ये ९७.८६ टक्के, विहारमध्ये १०० टक्के आणि तुलसीमध्ये १०० टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.