Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित  
मुंबई

Mumbai : 'दिवाळी पहाट' कार्यक्रमांचा सुरेल फराळ; पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सणाचा उत्साह द्विगुणित

दिवाळीनिमित्त मुंबई महानगर क्षेत्रात दादर, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली अशा विविध ठिकाणी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमुळे सणाचा उत्साह द्विगुणित केला.

Swapnil S

मुंबई : दिवाळीनिमित्त मुंबई महानगर क्षेत्रात दादर, नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली अशा विविध ठिकाणी रविवारी आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांमुळे सणाचा उत्साह द्विगुणित केला. पहाटेच्या प्रसन्न वातावरणात रंगलेल्या या संगीत मैफली, कविता आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून नागरिकांनी दिवाळीची सुरेल सुरुवात केली. या कार्यक्रमांमध्ये नामवंत गायकांच्या भावपूर्ण सादरीकरणाने रसिकांना मंत्रमुग्ध केले.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांनी दिवाळी साधेपणाने साजरी करण्याचे ठरवले आहे. दादर शिवाजी पार्क मैदानात मोठ्या संख्येने कंदील लावण्यात येतात. परंतु यंदा मनसेने दिवाळीनिमित्तचा कार्यक्रम रद्द केला आहे. मात्र राजकीय पक्षांकडून मुंबईत अनेक ठिकाणी होर्डिंगच्या माध्यमातून नागरिकांना शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

विद्युत रोषणाईने मुंबई निघाली उजळून

काही भागात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच आकर्षक कंदील लावले असून विद्युत रोषणाईने मुंबई उजळून निघाली आहे. दादर पश्चिम येथील छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये विशेष ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे आणि गायिका प्राजक्ता शुक्रे यांच्या सुमधुर गायनाने मैफलीत रंगत आणली. अभि मुंडे यांच्या कविता वाचनाने कार्यक्रमाला साहित्यिक स्पर्श लाभला.

शहरात दिवाळीचा उत्सवी माहोल

दिवाळी पहाटचे कार्यक्रम ही मुंबईची सांस्कृतिक परंपरा बनली असून, या निमित्ताने कुटुंबीय आणि मित्रमंडळी एकत्र येऊन संगीताचा आनंद घेतात. यंदाही विविध ठिकाणी रंगलेल्या सुरेल मैफलींमुळे शहरात दिवाळीचा उत्सवी माहोल निर्माण झाला.

ठाणे, नवी मुंबई, डोंबिवलीत जल्लोष

शहर आणि उपनगरांतील विविध सांस्कृतिक संस्थांनीही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. ठाणे येथे तलावपाळी, डोंबिवलीमधील फडके रोड, नवी मुंबईतील विविध ठिकाणी पहाटेपासूनच संगीतप्रेमींनी या कार्यक्रमांना उपस्थिती लावत सुरेल गाण्यांचा आनंद घेतला. पारंपरिक आणि लोकप्रिय गीतांच्या सादरीकरणाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. तरुण-तरुणींनी ठाणे, डोंबिवली, दादरच्या रस्त्यांवर तोबा गर्दी केली होती. गप्पा, सेल्फी, धमालमस्ती, हॉटेलिंग चालू होते.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

‘गोकुळ’साठी आज कोल्हापुरात 'संघर्ष मोर्चा'

माझे पुस्तक 'राजकीय' नाही, वैयक्तिक कहाणी; सोनिया गांधी यांचे आत्मचरित्राबाबत स्पष्टीकरण

पार्थ पवार यांची शरद पवारांशी पुन्हा भेट; आमच्या भेटीत राजकीय चर्चा नाही - प्रफुल्ल पटेल

सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नांवर तत्काळ कार्यवाही करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

'नोटाबंदी'ने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, 'व्होटचोरी'मुळे लोकशाही धोक्यात; पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल