मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा दसरा मेळावा मंगळवारी ( दि २०) दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर होणार आहे. या मेळाव्यासाठी राज्यभरातून हजारो शिवसैनिक आणि पदाधिकारी मुंबईत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे दादर आणि आसपासच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होऊ शकते. ही परिस्थिती लक्षात घेऊन मुंबई वाहतूक पोलिसांनी काही रस्ते बंद ठेवण्याचा, वाहतूक पर्यायी मार्गांवर वळवण्याचा आणि वाहनांच्या पार्किंगवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे.
२० ऑक्टोबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११.५५ वाजेपर्यंत हे वाहतूक बदल लागू असतील. वाहतूक विभागाच्या पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे यांनी यासंदर्भात अधिसूचना जारी केल्याचे 'मिड-डे'च्या वृत्तात म्हटले आहे.
दादर, माहीम, प्रभादेवी परिसरासह पश्चिम आणि पूर्व द्रुतगती महामार्गावरही वाहतुकीचा वेग मंदावण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भागातून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
कोणते रस्ते बंद राहणार? पर्यायी मार्ग कोणते?
१. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते माहीममधील कापड बाजार जंक्शनदरम्यान वाहनांना प्रवेश नसेल. वाहनचालकांना सिद्धिविनायक जंक्शन, एस. के. बोले मार्ग, आगर बाजार, पोर्तुगीज चर्च आणि गोखले मार्गाचा वापर करता येईल.
२. राजा बढे चौक ते केळुसकर मार्ग : राजा बढे चौक जंक्शन ते केळुसकर मार्ग उत्तर जंक्शनदरम्यान वाहतूक निर्बंध असतील. वाहनचालक एल. जे. मार्ग, गोखले मार्ग आणि स्टीलमन जंक्शनमार्गे जाऊ शकतील.
३. लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग : पांडुरंग नाईक मार्ग जंक्शनपासून दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांना निर्बंध असतील. या वाहनांनी राजा बढे जंक्शनकडे जाऊन पुढे एल. जे. मार्गाचा वापर करावा.
४. केळुसकर मार्ग : गडकरी चौकातून केळुसकर मार्गाच्या उत्तर आणि दक्षिण भागात वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही. पर्यायी मार्ग म्हणून एम. बी. राऊत मार्गाचा वापर करता येईल.
आणखी कोणत्या मार्गांवर वाहतूक वळवणार?
पद्माबाई ठक्कर मार्ग जंक्शनपासून सेनापती बापट मार्गे एल. जे. मार्गाकडे जाणारी बाल गोविंददास मार्गावरील वाहतूक मनोरमा नगरकर मार्गावर वळवली जाऊ शकते.
तसेच सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शनदरम्यान दादासाहेब रेगे मार्गावरील वाहतूक एल. जे. मार्ग, गोखले मार्ग आणि रानडे मार्गावर वळवण्यात येईल.
गर्दीच्या परिस्थितीनुसार दिवसभरात आणखी काही वाहतूक बदल करण्याचा निर्णयही पोलिस घेऊ शकतात.
'या' ८ रस्त्यांवर पार्किंगला बंदी
दसरा मेळाव्याच्या दिवशी खालील आठ रस्त्यांवर आणि संबंधित भागांत वाहने उभी करण्यास मनाई असेल.
१. स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग : सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक सिग्नल.
२. केळुसकर मार्ग : उत्तर आणि दक्षिणेकडील दोन्ही भाग.
३. एम. बी. राऊत मार्ग : स्वातंत्र्यवीर सावरकर मार्गाच्या जंक्शनपासून पुढील भाग.
४. पांडुरंग नाईक मार्ग.
५. दादासाहेब रेगे मार्ग : सेनापती बापट पुतळा ते गडकरी जंक्शन.
६. लेफ्टनंट दिलीप गुप्ते मार्ग : शिवाजी पार्क गेट क्रमांक ५ ते शीतलादेवी मंदिर जंक्शन.
७. एन. सी. केळकर मार्ग : गडकरी जंक्शन ते हनुमान मंदिर जंक्शन.
८. एल. जे. मार्ग : राजा बढे जंक्शन ते गडकरी जंक्शन.
मेळाव्यासाठी येणाऱ्या वाहनांची पार्किंग व्यवस्था कुठे?
पश्चिम द्रुतगती महामार्गावरून येणारी वाहने : या मार्गावरून येणाऱ्या बससाठी सेनापती बापट मार्ग आणि एल्फिन्स्टन पश्चिमेकडील कामगार मैदान येथे पार्किंगची व्यवस्था असेल. कारसाठी सेनापती बापट मार्गावरील इंडियाबुल्स फायनान्स सेंटर आणि दादर पश्चिमेतील कोहिनूर मिल कंपाउंडमधील कोहिनूर स्क्वेअर येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध असेल.
ठाणे आणि नवी मुंबईहून येणारी वाहने : पूर्व द्रुतगती महामार्गावरून येणाऱ्या बससाठी माटुंगा पूर्वेतील लेडी जमशेटजी मार्गावरील फाइव्ह गार्डन्स, नाथालाल पारेख मार्ग आणि एडनवाला मार्ग येथे पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच वडाळा पश्चिमेतील आर. ए. के. मार्गावरील आर. ए. के./चार रस्ता परिसरातही बस उभ्या करता येतील.
दक्षिण मुंबईतून येणारी वाहने : वीर सावरकर मार्गावरून येणाऱ्या वाहनांनी रवींद्र नाट्य मंदिराजवळ प्रवाशांना उतरवावे. त्यानंतर बस प्रभादेवीतील आप्पासाहेब मराठे मार्गावर उभ्या करता येतील. कारसाठी एल्फिन्स्टन पश्चिमेतील सेनापती बापट मार्गावरील ज्युपिटर मिल कंपाउंडमधील इंडियाबुल्स वन सेंटर येथे पार्किंगची व्यवस्था असेल.
दादरमधून प्रवास करताय? 'ही' काळजी घ्या
२० ऑक्टोबर रोजी दादर, माहीम, प्रभादेवी आणि आसपासच्या भागांत मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासाचे नियोजन आधीच करावे. शक्य असल्यास गर्दीच्या भागातील रस्ते टाळावेत.
वाहतूक पोलिसांनी निश्चित केलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा आणि रस्त्यावर तैनात असलेल्या पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन मुंबई वाहतूक पोलिसांनी केले आहे.