मुंबईच्या पूर्व उपनगरांत गुन्हेगारी वाढली; खून, अपहरण, चोरी आणि खंडणीच्या घटनांत मोठी वाढ  प्रातिनिधिक छायाचित्र
मुंबई

मुंबईच्या पूर्व उपनगरांत गुन्हेगारी वाढली; खून, अपहरण, चोरी आणि खंडणीच्या घटनांत मोठी वाढ

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या पूर्व उपनगरांत अपहरण, चोरी, खंडणी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

Swapnil S

अवधूत खराडे/मुंबई :

चेंबूर, गोवंडी, मानखुर्द, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या पूर्व उपनगरांत अपहरण, चोरी, खंडणी आणि दरोड्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे.

मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये गंभीर गुन्ह्यांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याचे पोलीस दलाच्या ताज्या आकडेवारीवरून समोर आले आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या या विभागात १८ पोलीस ठाण्यांचा समावेश होतो.

मुंबईत २०२५ मध्ये नोंदवलेल्या एकूण १२६ खून प्रकरणांपैकी ३२ गुन्हे एकट्या पूर्व उपनगरांत घडले आहेत. २०२४ मधील ३३ च्या तुलनेत ही संख्या किंचित कमी असली, तरी मुंबईतील सर्व विभागांमध्ये ती सर्वाधिक आहे. खुनाच्या प्रयत्नांच्या घटनांमध्येही ही उपनगरे आघाडीवर असून, गेल्या वर्षी १३७ असलेले हे प्रमाण यंदा १२८ नोंदवले आहे. मालमत्तेशी संबंधित गुन्ह्यांमध्ये मोठी वाढ झाली असून, चोरीची प्रकरणे १,३२९ वरून १,४६० पर्यंत पोहोचली आहेत. तसेच वाहन चोरीच्या घटना ४४५ वरून ४५४ झाल्या आहेत.

अपहरणाच्या घटना वाढल्या

गेल्या एका वर्षात अपहरणाच्या घटना ३४७ वरून ३९६ वर गेल्या आहेत. मुंबईतील एकूण १,४२३ अपहरण प्रकरणांमध्ये पूर्व उपनगरांचा वाटा मोठा आहे. महिलांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर असून अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना १६५ वरून १७६, तर प्रौढ महिलांवरील अत्याचाराची प्रकरणे ९८ वरून १०१ झाली आहेत. विनयभंगाच्या घटना ५३१ वरून ५२८ कमी झाल्या आहेत.

संघटित गुन्हे वाढले

संघटित आणि हिंसक गुन्ह्यांमध्येही वाढ झाली असून दरोड्याच्या घटना जवळपास दुप्पट झाल्या आहेत. २०२४ मध्ये दरोड्याचे ७ गुन्हे नोंद झाले होते, तर २०२५ मध्ये ही संख्या १२ वर पोहोचली आहे. खंडणीच्या प्रकरणांत ५६ वरून ७४ पर्यंत वाढ झाली असून यामुळे या भागात संघटित गुन्हेगारीचे जाळे विस्तारत असल्याचे दिसून येत आहे. काही गुन्ह्यांमध्ये दिलासा मिळाला असून जबरी चोरीच्या घटना १२९ वरून ११४ वर, तर घरफोडीची प्रकरणे २५६ वरून २१४ वर आली आहेत. या वाढत्या गुन्हेगारीबाबत अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. महेश पाटील यांच्याकडे प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

पूर्व उपनगरांतील गुन्हेगारी आकडेवारी

  • चोरी: १,४६० (२०२५), १,३२९ (२०२४)

  • अपहरण: ३९६ (२०२५), ३४७ (२०२४)

  • खंडणी: ७४ (२०२५), ५६ (२०२४)

  • खून: ३२ (२०२५), ३३ (२०२४)

  • अल्पवयीन मुलींवर अत्याचार: १७६ (२०२५), १६५ (२०२४)

  • दरोडा: १२ (२०२५), ७ (२०२४)

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या; वैशाखी उत्सवादरम्यान गुरुद्वाराबाहेर हल्ला

डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

Mira-Bhayandar : भाजपा पाठोपाठ शिंदे गट देखील आक्रमक; आमदार नरेंद्र मेहतांना तडीपार करण्यासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम