मुंबई : स्वयंपाकघरातील झुरळे, कीटक, कृत्रिम रंगांचा व अजिनाेमोटोचा (एमएसजी) अतिवापर, वारंवार वापरलेले काळे पडलेले तेल आणि अस्वच्छ वातावरण यांसारख्या गंभीर त्रुटी आढळल्याने महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबईतील चार खाद्यपदार्थ आस्थापनांचे परवाने तडकाफडकी निलंबित केले आहेत.
एफडीएने कलिना येथील गरवारे इन्स्टिट्यूटमधील ‘मेसर्स अक्षय कॅटरर्स’, वांद्रे-कुर्ला संकुलातील (बीकेसी) ‘क्राफ्टपॅक हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड’, दादर पश्चिम येथील ‘मेसर्स मरिअन हॉटेल अँड रेस्टॉरंट’ आणि चेंबूरच्या टिळकनगर येथील ‘मेसर्स भगवती स्टोअर्स’ या चार आस्थापनांवर ही कारवाई केली आहे. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, २००६ अंतर्गत हे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत.
अन्न सुरक्षेबाबत एफडीएने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतला जाणार नाही. प्रत्येकाला शुद्ध आणि सुरक्षित अन्न मिळण्याचा अधिकार आहे. भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न विकणाऱ्यांवर या पुढेही कठोर कारवाई केली जाईल.तुकाराम मुंढे, आयुक्त, एफडीए
अन्नाचे एकत्रीकरण
शाकाहारी आणि मांसाहारी अन्न तयार करण्यासाठी एकच जागा, कटिंग बोर्ड आणि भांडी वापरली जात असल्याने अन्नामध्ये संसर्ग (क्रॉस-कंटॅमिनेशन) होण्याचा मोठा धोका निर्माण झाला होता.
सांडपाण्याची दुरवस्था
आस्थापनांमध्ये सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नव्हती. ठिकठिकाणी साचलेले घाण पाणी, शेवाळ आणि तीव्र दुर्गंधी आढळली.
अन्नपदार्थांत भेसळ
खाद्यपदार्थांमध्ये कृत्रिम रंग आणि मोनोसोडियम ग्लुटामेटचा (एमएसजी/अजिनाेमोटो) अनियंत्रित आणि अतिवापर केला जात होता तसेच तळण्यासाठी वापरलेले तेल वारंवार गरम करून वापरल्यामुळे ते काळे आणि आरोग्यास घातक बनले होते.
अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव
किचन आणि अन्न साठवणुकीच्या जागांमध्ये झुरळे आणि कीटकांचा वावर आढळून आला. एका ठिकाणी शिजवलेला भात जिन्याखाली उघड्यावर ठेवण्यात आला होता, जिथे भिंतींवर बुरशी, ओल आणि पाण्याचे थेंब जमा झाले होते.
गंजलेली भांडी
अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी आणि सुऱ्या अत्यंत गंजलेल्या, तेलकट आणि अस्वच्छ स्थितीत होत्या.