मुंबई : अन्नसुरक्षितता आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) मुंबई विभागातील १७ खाद्य आस्थापनांचे परवाने किंवा नोंदणी निलंबित केली आहे. यामध्ये लोअर परळ येथील ‘इन्स्टाकार्ट सर्व्हिसेस प्रा. लि.’ आणि परळ, मरोळ व बोरिवली पश्चिम येथील ‘जुबिलंट फुडवर्क्स’द्वारे चालवल्या जाणाऱ्या तीन डोमिनोज पिझ्झा आऊटलेट्सचा समावेश आहे.
या कारवाईत सांताक्रूझ पश्चिम येथील ‘कार्निव्हल बाय त्रेसिंड’, खार पश्चिम येथील ‘हुंडो पिझ्झा’, वांद्रे पश्चिम येथील ‘द पेनांग टेबल’, कांदिवली पश्चिम येथील ‘आशीर्वाद सुपर स्टोअर’ , गोवंडी येथील ‘अमिना हॉटेल’ आणि शिवडी येथील ‘थँक्सगिव्हिंग पाटीसरी अँड कन्फेक्शनरी’ यांचाही समावेश आहे.
एफडीएच्या म्हणण्यानुसार, केलेल्या तपासणी आणि फेर-तपासणीदरम्यान अनेक त्रुटी उघडकीला आल्या. यामध्ये अस्वच्छता, कीटकांचा प्रादुर्भाव, अन्नाची अयोग्य साठवणूक, अस्वच्छ परिसर आणि अनिवार्य नोंदी नसणे यांसारख्या बाबींचा समावेश आहे. काही आस्थापनांनी या आधी सुधारणा नोटीस देऊनही त्रुटी दूर केल्या नव्हत्या.
जे. जे. , नायर रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित
स्वेच्छिक रक्तदान शिबिरांमध्ये भेटवस्तू आणि प्रलोभने देण्यास बंदी घालणाऱ्या राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) रक्तदान शिबिरात रक्तदात्यांना ब्रँडेड घड्याळे वाटल्याबद्दल मुंबईतील तीन रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित केले आहेत. यामध्ये ‘इंडियन रेड क्रॉस सोसायटी ब्लड सेंटर’ला ५ दिवसांची तर जे. जे. रुग्णालय आणि बी. वाय. एल. नायर रुग्णालय येथील रक्तकेंद्रांना प्रत्येकी ३ दिवसांची निलंबनाची कारवाई सामोरी जावी लागली आहे.
कीटक, शाकाहारी-मांसाहारी एकत्र साठवण
तपासणी अधिकाऱ्यांना काही परिसरांमध्ये झुरळे आणि कीटक आढळले तर अन्नधान्याचे पॅकेट्स उंदरांनी कुरतडलेले असल्याचे निदर्शनास आले. इतर उल्लंघनांमध्ये नासके अन्नपदार्थ वापरणे, जळालेले किंवा अतिवापरलेले कुकिंग ऑइल वापरणे, कच्चे आणि शिजवलेले अन्न एकत्र ठेवणे तसेच शाकाहारी आणि मांसाहारी अन्न एकत्र साठवणे यांचा समावेश होता.
अस्वच्छता, सुरक्षा साधनांशिवाय काम
एफडीएने तापमानाचे निर्देशक नसलेली किंवा योग्य तारखेची नोंद नसलेली अस्वच्छ रेफ्रिजरेटर्स, मळके किंवा खराब झालेले फ्लोरिंग (फरशी), साचलेले पाणी आणि अन्न हाताळण्याच्या भागात उघडी डस्टबिन या बाबींवरही आक्षेप घेतला. अनेक कामगार विना-अप्रन, विना-हेडगिअर आणि इतर सुरक्षा साधनांशिवाय काम करताना आढळले.
दर्शनी भागात परवाने नाहीत
अनेक आस्थापनांकडे खरेदीची बिले, पेस्ट कंट्रोल अहवाल, अन्न-हाताळणी प्रशिक्षण प्रमाणपत्रे आणि अन्नपदार्थ व पिण्याच्या पाण्याच्या चाचणीचे प्रयोगशाळा अहवाल यांसारखी अनिवार्य कागदपत्रे आढळली नाहीत. काही परिसरांमध्ये त्यांचे एफएसएसएआय परवाने दर्शनी भागात लावण्यात आलेले नव्हते.
मालाड, जुहूमध्येही कारवाई
कारवाईला सामोरे गेलेल्या इतर आस्थापनांमध्ये मालाड पश्चिम येथील ‘स्वीट नाईफ रेस्तो’, जुहू येथील ‘जय कल्याण कॅन्टीन’, खार पश्चिम येथील ‘राजस्थान रेस्टॉरंट’, अंधेरी पश्चिम येथील ‘दार्जिलिंग लेप्चा मोमोज’, वर्सोवा येथील ‘साहिल हॉटेल’, अंधेरी पश्चिम येथील ‘तृप्ती फरसान अँड स्वीट्स’ आणि धारावी येथील ‘हॉटेल थेरेसा’ यांचा समावेश आहे. दरम्यान, कांदिवलीतही कारवाई करण्यात आली.