मुंबई

Mumbai : सहा हॉटेल्सवर FDA ची कारवाई; उंदीर, झुरळांचा सुळसुळाट; अन्न जप्त, परवाने निलंबित

स्वयंपाकघरातील कमालीची अस्वच्छता, मुदत संपलेला अन्नसाठा आणि बनावट उत्पादनांचा वापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दक्षिण मुंबईतील एका उच्चभ्रू हॉटेलसह एकूण ६ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत.

Swapnil S

मुंबई : स्वयंपाकघरातील कमालीची अस्वच्छता, मुदत संपलेला अन्नसाठा आणि बनावट उत्पादनांचा वापर केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दक्षिण मुंबईतील एका उच्चभ्रू हॉटेलसह एकूण ६ हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सचे व्यवसाय परवाने निलंबित केले आहेत. एका विशेष राज्यव्यापी मोहिमेंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मंगळवारी दिली.

नरिमन पॉइंटसारख्या उच्चभ्रू भागातील 'फ्लिंट अँड वारसा' या रेस्टॉरंटसह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील इतर पाच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि एका बेकरीवर ही कारवाई करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी २७ जूनला 'फ्लिंट अँड वारसा' रेस्टॉरंटची तपासणी केली होती. तेथे संशयास्पद आणि बनावट उत्पादने आढळल्याने प्रयोगशाळा चाचणीसाठी ५ नमुने गोळा करण्यात आले असून ११,३५० रुपयांचा साठा जप्त केला आहे. याशिवाय, मुदत संपलेला १६,२०१ रुपयांचा अन्नसाठाही आढळला, जो अधिकाऱ्यांनी तेथेच नष्ट केला, असे एफडीएच्या निवेदनात म्हटले आहे.

अन्न उघड्यावर

एफडीएने सोमवारी बोरिवली, सांताक्रूझ, अंधेरी, वांद्रे आणि भांडुप परिसरातील खाद्यपदार्थांच्या दुकानांवर आणि हॉटेल्सवर छापे टाकले. या तपासणीदरम्यान स्वयंपाकघरात आणि साठवणुकीच्या ठिकाणी उंदीर, झुरळे आणि अत्यंत अस्वच्छ वातावरणात उघड्यावर ठेवलेले कच्चे अन्न आढळले तसेच या आस्थापनांकडे आवश्यक कागदपत्रे नव्हती आणि तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची कोणतीही वैद्यकीय तपासणी करण्यात आलेली नव्हती. स्वयंपाकघरातील गंभीर अस्वच्छता, निकृष्ट दर्जाची शीतकरण यंत्रणा व ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी यंत्रणा नसणे, या कारणांमुळे या सर्व हॉटेल्सचे परवाने तातडीने निलंबित करण्यात आले आहेत.

३१ ठिकाणी छापे

एफडीएने दिलेल्या माहितीनुसार, २६ ते २८ जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात एकूण ३१ ठिकाणी छापे टाकण्यात आले. या कारवाईत बंदी असलेला पानमसाला आणि गुटखा असा एकूण ३४.८७ लाख रुपयांचा साठा जप्त करण्यात आला आहे. प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, वितरण आणि वाहतूक केल्याप्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली असून एक दुकान सील केले आहे आणि तीन वाहने जप्त करण्यात आली आहेत. सार्वजनिक आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, तसेच नागरिकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत यासाठी ही धडक मोहीम या पुढेही सुरूच राहील, असा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mobile SIM Rules: आजपासून सिम कार्ड खरेदीचा नवा नियम लागू! एका व्यक्तीच्या नावावर फक्त 'इतकेच' नंबर चालणार

साखरेची दर घसरण सुरू; सरकारच्या साठा मर्यादेचा परिणाम, साखर फॅक्टरी फेडरेशनचे अध्यक्ष नाईकनवरे यांची माहिती

Mumbai : 'आम्ही शाळेतच गेलो नाही, मग मराठी कशी बोलणार?'; भाषेच्या सक्तीविरोधात रिक्षाचालकांचा ३ दिवसांचा संप

राज्यांनी PNG ला गती द्यावी; केंद्र सरकारचा राज्यांना आग्रह, जिल्हास्तरीय अधिकारी नेमा

दिल्लीत मुसळधार पावसाचा तडाखा; खराब हवामानामुळे २६ उड्डाणे रद्द, १५ विमानांचे बदलले मार्ग