बस्तरच्या सफरीसाठी उत्साहात निघालेल्या मुंबईतील २४ वर्षीय महिला बायकरचा बुधवारी (दि.१२) छत्तीसगडमध्ये भीषण अपघातात मृत्यू झाला. रिद्धी दिव्येश ठक्कर असे मृत तरुणीचे नाव असून, ती कांदिवली पश्चिम येथे राहत होती. २३ महिला बायकर्सच्या ग्रुपसोबत रायपूरहून बस्तरकडे जात असताना धमतरी जिल्ह्यातील मार्काटोला घाट परिसरात तिच्या दुचाकीला एका भरधाव अवजड वाहनाने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या रिद्धीला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिचे प्राण वाचू शकले नाहीत. अपघातानंतर संबंधित वाहनचालक घटनास्थळावरून निघून गेला असून, पोलिसांकडून वाहन आणि चालकाचा शोध सुरू आहे.
बस्तर सफरीत काळाचा घाला
मिळालेल्या माहितीनुसार, देशातील विविध भागांतील २३ महिला बायकर्सचा एक ग्रुप छत्तीसगडमध्ये एकत्र आला होता. या ग्रुपमध्ये २० मोटरसायकली आणि एक कार होती. सर्वजणी रायपूरहून बस्तरच्या दिशेने जात होत्या. बुधवारी पहाटे सुमारे ५ ते ६ वाजण्याच्या सुमारास ग्रुपमधील बहुतांश बायकर्स पुढे निघून गेल्या होत्या. रिद्धी आणि काही महिला बायकर्स मागून येत होत्या. याचदरम्यान धमतरी-बालोद सीमेवरील मार्काटोला-जगतरा घाट परिसरात रिद्धीच्या मोटरसायकलला भरधाव अवजड वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देणारे वाहन ट्रेलर असल्याचे सांगण्यात आले आहे. धडकेनंतर रिद्धी रस्त्यावर फेकली गेली आणि गंभीर जखमी झाली. अपघातानंतर संबंधित वाहनचालक वाहनासह घटनास्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे. वाहनाची नेमकी ओळख पटवण्यासह चालकाचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.
१५ तासांपूर्वीच इंस्टाग्रामवर “लेट्स एक्सप्लोर बस्तर”ची स्टोरी...
बस्तरची सफर सुरू करण्यापूर्वी अवघ्या १५ तासांपूर्वी रिद्धीने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली होती. “लेट्स एक्सप्लोर बस्तर” असे तिने या पोस्टमध्ये म्हटले होते. उत्साहाने सुरू झालेल्या या प्रवासादरम्यानच तिच्यावर काळाने घाला घातला.
रुग्णालयात नेले, पण प्राण वाचले नाहीत
अपघातानंतर तातडीने ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. रिद्धीला सुरुवातीला उपचारासाठी चारामा येथील आरोग्य केंद्रात नेण्यात आले. तिची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारांसाठी तिला धमतरीतील रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, तिच्या दुखापती गंभीर होत्या. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर रिद्धीचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
वाहनचालकाचा शोध सुरू
या अपघाताप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. रिद्धीसोबत प्रवास करणाऱ्या महिला बायकर्सकडूनही घटनेची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धडक देऊन घटनास्थळावरून निघून गेलेल्या वाहनाचा शोध घेतला जात आहे. संबंधित परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, प्रत्यक्षदर्शींकडूनही माहिती घेतली जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच धमतरी महानगरपालिकेच्या महापौरांनी रुग्णालयात जाऊन परिस्थितीची माहिती घेतली. त्यांनी रिद्धीच्या मुंबईतील कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांचे सांत्वन केले.