मुंबई

घाटकोपर होर्डिंग दुर्घटना : भावेश भिंडेला पोलीस कोठडी; आता क्राईम ब्रांच करणार तपास

Swapnil S

मुंबई : घाटकोपर येथील होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी राजस्थानात अटक केलेल्या इगो मीडिया प्रा. लिमिटेड कंपनीचा मालक भावेश भिंडे याला किल्ला न्यायालयाने २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यांचा तपास आता पंतनगर पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला असून युनिट सातचे अधिकारी या गुन्ह्यांचा तपास करत आहेत.

सोमवारी इगो कंपनीचे एक होर्डिंग जवळच असलेल्या एका पेट्रोल पंपावर कोसळून त्यात सोळाजणांचा मृत्यू झाला होता तर ऐंशीहून अधिक लोक जखमी झाले होते. या दुर्घटनेनंतर पंतनगर पोलिसांनी इगो कंपनीचे भावेश भिंडेसह इतर आरोपीविरुद्ध सदोष मनुष्यवधासह भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच भावेश हा पळून गेला होता. त्याच्या घरासह कार्यालयात पोलिसांनी छापा टाकला होता. मात्र तो मुंबईतून पळून गेल्याचे लक्षात येताच त्याच्या अटकेसाठी स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेचे सात विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. ही शोधमोहीम सुरू असतानाच भावेशला गुरुवारी राजस्थानच्या उदयपूरमधील एका हॉटेलमधून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले होते. हॉटेलमध्ये तो भावेश पुजारा या नावाने राहत होता. याच नावाने त्याने हॉटेलचे रूम बुक केले होते. शुक्रवारी सकाळी मुंबईत आणल्यानंतर भावेशला गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. त्यानंतर त्याला किल्ला न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांच्या वतीने सरकारी वकिलांनी भावेशच्या १४ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्याच्या कंपनीचे शहरात इतरत्र होर्डिंग असून त्याची माहिती काढली जात काढली आहे. एका होर्डिंगसाठी पाच कोटी लागत आहे. या आर्थिक व्यवहाराचा तपशील काढण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले. या गुन्ह्यात त्याच्यासोबत इतर काही संचालकाची भूमिका पडताळून पाहिली जाणार आहे. या होर्डिंगसाठी त्याला कशा प्रकारे परवानग्या मिळाल्या. त्या कोणी दिल्या. त्यात काही आर्थिक व्यवहार झाले होते. होर्डिंगचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम असल्याचा संशय आहे. या प्रकरणाचा तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

२०१३ साली झालेल्या ऑडिटमध्ये ते स्ट्रक्चर उत्तम दर्जाचे असल्याचे नमूद केले होते. त्याची उंची, लांबी, रुंदी आणि इतर गोष्टीचा उल्लेख करण्यात आल्याचा दावा आरोपीचे वकील रिझवान मर्चंट यांनी केला. भावेश हा इगो कंपनीचा डिसेंबर २०२३ रोजी संचालक झाला. मात्र, तत्पूर्वी नोव्हेंबर २०२२ साली या होर्डिंग्जचे काम इगो कंपनीला दिले होते. त्यामुळे या दुर्घटनेलला भावेश जबाबदार नाही. या गुन्ह्यात ३०४ कलम लागू शकत नाही असे युक्तिवाद करताना आरोपीला अटक करताना पोलिसांनी नियमांचे पालन केले नाही, असा आरोपही रिझवान मर्चंट यांनी केला. दोन्ही बाजू ऐकल्यांनतर न्यायालयाने भावेशला २६ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे आता भावेशची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाऱ्याच्या वेगामुळे दुर्घटना घडली

ज्या दिवशी ही दुर्घटना घडली. त्या दिवशी वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाऱ्याचा वेग हा ताशी ९६ किमी होता. एरव्ही वाऱ्याचा वेग आहे ताशी ५० ते ६० किमी असतो. त्यामुळेच ही दुर्घटना घडल्याचा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त