मुंबई : घाटकोपर छेडानगर येथील बेकायदा होर्डिंग दुर्घटनेत तब्बल ५५ तासांनंतर बुधवारी रात्री दोन जणांचे मृतदेह सापडले. या दुर्घटनेत आतापर्यंत १७ जणांचा मृत्यू झाला. यात मुंबई विमानतळाचे एअर ट्रॅफिक कंट्रोलचे सेवानिवृत्त महाव्यवस्थापक मनोज चंसोरिया (६०) यांच्यासह पत्नी अनिता या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, जबलपूरवरून कामानिमित्त ते मुंबईत आले होते आणि काम संपवून पुन्हा जबलपूरला जाणार होते. मात्र जबलपूर ते मुंबई त्यांचा हा प्रवास अखेरचा ठरला.
कामानिमित्त मुंबईत आलेले मनोज चंसोरिया काम संपल्यावर सोमवारी ते पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी थांबले होते. त्याच वेळी मुंबईत वादळीवाऱ्यासह पावसाचा तडाखा बसला आणि यात महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळले आणि चंसोरिया हा त्यांचा अखेरचा दिवस ठरला. मार्च महिन्यात सेवानिवृत्त झालेले मनोज चंसोरिया यांचा मुलगा अमेरिकेत वास्तव्यास आहे. अमेरिकेतून त्यांचा मुलगा संपर्क साधत होता, मात्र बराच वेळ वडील फोन उचलत नसल्याने अखेर मुलाने मुंबई पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी तत्काळ मोबाईल ट्रेस केला असता, मोबाईलचे लोकेशन घटनास्थळाचे दाखवले.
मोबाईल लोकेशन छेडानगर येथील पेट्रोल पंपाचे असल्याचे कळताच त्यांच्या नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत चंसोरिया दांपत्य सुखरूप बाहेर यावे, यासाठी देवाची प्रार्थना सुरू केली. मात्र बुधवारी रात्री मनोज चंसोरिया व पत्नी अनिता या दोघांचे मृतदेह सापडल्याने परिवारात हळहळ व्यक्त करण्यात आली.