Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट 
मुंबई

Mumbai : धक्कादायक! वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला झाडूने मारहाण; Video व्हायरल होताच संतापाची लाट

मुंबईतील बोरीवलीच्या गोराई-२ परिसरातील एका वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. झाडूने मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Mayuri Gawade

मुंबईतील बोरीवलीच्या गोराई-२ परिसरात एका वृद्धाश्रमात ज्येष्ठ महिलेला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. वृद्धाश्रमांमधील ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

काय दिसतंय व्हिडिओमध्ये?

व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये वृद्धाश्रमातील एका महिला कर्मचाऱ्याने ज्येष्ठ महिलेला शिवीगाळ करत झाडूने मारहाण केल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. महिलेला मारहाण होत असताना ती वेदनेने ओरडताना आणि रडताना ऐकू येते. ही घटना आश्रमातील एका खोलीत घडल्याचे दिसते.

या व्हिडीओमध्ये आणखी एक महिला उपस्थित असूनही ती या प्रकारात हस्तक्षेप करताना दिसत नाही. त्यामुळे हा एकटाच प्रकार नसून, अशा प्रकारची वागणूक वारंवार होत असावी, अशी शंका व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, हा संपूर्ण प्रकार शेजारच्या इमारतीतून एका व्यक्तीने मोबाईलमध्ये चित्रीत केला. त्या व्यक्तीने आवाज देताच संबंधित कर्मचारी मारहाण थांबवते. मात्र, त्यानंतरही ज्येष्ठ महिला रडत असल्याचे ऐकू येते.

पोलीस कारवाईबाबत संभ्रम

स्थानिकांच्या माहितीनुसार, या प्रकरणात संबंधित कर्मचारी आणि वृद्धाश्रमाचा मालक यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची चर्चा आहे. मात्र, याबाबत अधिकृत पुष्टी अद्याप मिळालेली नाही. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याचे सांगितले जात आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहा

ज्येष्ठांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

या घटनेनंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू झाली आहे. वृद्धाश्रमांमध्ये राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित आणि सन्मानाची वागणूक मिळते का, याबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा संस्थांवर अधिक कडक नियम, नियमित तपासणी आणि जबाबदारी निश्चित करण्याची गरज असल्याची मागणी होत आहे.

अनेक ज्येष्ठ नागरिकांना कुटुंबाचा आधार नसल्यामुळे किंवा इतर कारणांमुळे वृद्धाश्रमात राहावं लागतं. अशा ठिकाणी त्यांची काळजी घेण्याऐवजी जर अत्याचार होत असतील, तर हा गंभीर सामाजिक प्रश्न ठरतो.

वृद्धाश्रम हे सुरक्षित आणि काळजी घेणारे ठिकाण असावे, अशी अपेक्षा असते. मात्र, या घटनेमुळे अशा संस्थांमधील परिस्थितीबाबत चिंता वाढली आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर उद्या मेगाब्लॉक; मुख्य आणि हार्बर मार्गावर ब्लॉक

Jantar Mantar Assault Case : स्वतंत्र भारद्वाज अटकेत; न्यायालयाकडून एक दिवसाची पोलीस कोठडी

Mumbai Dahi Handi 2026 : मालाडमध्ये विटांचा खांब कोसळला; ७ वर्षांच्या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू

Mumbai Dahi Handi 2026 : दहीहंडीच्या उत्साहाला अपघातांचं गालबोट; २२ गोविंदा जखमी

नळदुर्ग किल्ल्यावरून महिला कुस्तीपटूची तीन मुलांसह उडी; सासरच्या जाचाला कंटाळून उचलले टोकाचे पाऊल, चौघांवर गुन्हा दाखल