देवश्री भुजबळ/मुंबई :
गोरेगाव पूर्व येथील मेट्रो स्टेशनखाली शुक्रवारी संध्याकाळी 'महादेव ट्रॅव्हल्स'च्या एका खासगी व्हॉल्व्हो टुरिस्ट बसला अचानक आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली आणि महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती. ही बस गुजरातच्या दिशेने जात असताना चालत्या गाडीतच ही आग लागली. सुदैवाने, आग पूर्णपणे पसरण्यापूर्वीच बसमधील पाच प्रवासी आणि चालक सुरक्षितपणे बाहेर पडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याचा अंदाज आहे. गोरेगाव पूर्व येथील ओबेरॉय गार्डन सिटी मेट्रो स्टेशनखालील चेक नाका सिग्नलजवळ संध्याकाळी ६.१५ वाजता ही घटना घडली, अशी माहिती महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्याने दिली. अग्निशामक दल पोहोचण्यापूर्वीच तेथील स्थानिकांनी पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळी ६.३८ वाजता आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात आले.
घटनेनंतर मोठी वाहतूक कोंडी
या घटनेनंतर महामार्गाच्या काही मार्गिका बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी झाली होती, मात्र नंतर पोलिसांनी वाहतूक पूर्ववत केली. उपपोलीस आयुक्त गजानन राजमाने यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरातच्या दिशेने जाणारी 'महादेव ट्रॅव्हल्स'ची बस (एमएच ०१ एएन १६९५) गोरेगाव पूर्व मेट्रो स्थानकाखाली आली असताना ही दुर्घटना घडली. बसमध्ये चालक निजार कापडिया यांच्यासह पाच प्रवासी होते आणि सर्वजण पूर्णपणे सुरक्षित आहेत. आग विझवण्यात आली असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. प्रथमदर्शनी तांत्रिक बिघाडामुळेच ही आग लागल्याचे समोर आले आहे.