मुंबई : मॅकडोवेल्स नंबर १ सेलिब्रेशन मॅच्युअर्ड रम आणि ओल्ड मंक या लोकप्रिय मद्य ब्रँड्सवर बंदी घालण्याच्या आदेशांवरून मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला (एफएसएसएआय) धारेवर धरले. हा वाद उत्पादनाची गुणवत्ता किंवा सुरक्षेपेक्षा मुख्यत्वे लेबलिंगशी संबंधित असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर युनायटेड स्पिरिट्स लि. आणि मोहन मीकिन लि. या मद्य उत्पादक कंपन्यांनी दाखल केलेल्या याचिकांवर सुनावणी सुरू होती. एफएसएसएआयने त्यांच्या उत्पादन युनिट्सच्या तपासणीनंतर जारी केलेल्या बंदीच्या आदेशांना या याचिकांद्वारे आव्हान देण्यात आले आहे.
कोणतीही तक्रार नाही
युनायटेड स्पिरिट्सतर्फे उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील वीरेंद्र सराफ म्हणाले की, बंदीचा आदेश जारी करण्यापूर्वी कंपनीला आपली बाजू मांडण्याची योग्य संधी देण्यात आली नव्हती. हे उत्पादन गेल्या अनेक वर्षांपासून एकाच प्रक्रियेचा वापर करून बनवले जात असून त्याच्या गुणवत्तेबाबत किंवा ग्राहकांना कोणतीही इजा झाल्याबाबत कोणतीही तक्रार आलेली नाही, असा युक्तिवाद त्यांनी केला.