मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून १५ ऑगस्ट रोजी मुंबईत भव्य सोहळ्याची तयारी सुरू आहे. १४ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या संपूर्ण आठवड्याअंती चित्रपट महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, हुतात्म्यांना श्रद्धांजली, सायकल रॅली, मानवी साखळी, कार्यशाळा आणि विविध सामाजिक उपक्रमांची रेलचेल असणार आहे.
नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन-नॅशनल म्युझियम ऑफ इंडियन सिनेमातर्फे दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सहकार्याने १४ ते १६ ऑगस्ट दरम्यान पेडर रोडवरील ‘एनएफडीसी-एफडी कॉम्प्लेक्स’च्या ऑडी-२ मध्ये तीन दिवसीय ‘हर घर तिरंगा: देशभक्तीपर चित्रपट महोत्सव २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात भारताचा प्रवास आणि देशाच्या वीरपुत्रांचे स्मरण करणाऱ्या देशभक्तीपर चित्रपट, क्लासिक्स आणि माहितीपटांचे प्रदर्शन केले जाईल. १४ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता या महोत्सवाचे उद्घाटन होणार असून प्रवेश मोफत आणि ‘प्रथम येणाऱ्यास प्राधान्य’ या तत्त्वावर असेल.
१८ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता ‘एनएमआयसी’कडून ऑस्कर नामांकित ‘लगान’ हा चित्रपट ऑडी-२ मध्ये दाखवला जाईल, ज्याचा प्रवेश म्युझियम तिकिटामध्येच समाविष्ट असेल.
‘षण्मुखानंद फाइन आर्ट्स अँड संगीत सभा’तर्फे ‘साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी’ आणि ‘भारतीय सेना’ यांच्या सहकार्याने १५ ऑगस्ट रोजी किंग्ज सर्कल येथील षण्मुखानंद सभागृहात ८० हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबांचा गौरव करण्यात येणार आहे.
षण्मुखानंद सभेचे अध्यक्ष व्ही. शंकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून आमची संस्था सशस्त्र दलांच्या सन्मानार्थ दोन्ही राष्ट्रीय दिवस साजरे करत आहे. सभेतर्फे कालाकोट येथे दहशतवाद्यांशी लढताना दाखवलेल्या शौर्याबद्दल परशोत्तम कुमार यांना ‘श्री षण्मुखानंद शौर्य रत्न पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येईल. सभेने सातारा जिल्ह्यातील आपशिंगे गावात ‘अग्निवीर’ इच्छुकांसाठी सुमारे १ कोटी रुपये खर्चून फिनिशिंग स्कूल स्थापन केले आहे.
‘एसआयईएस’ शैक्षणिक संस्थांतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त सुमारे ४,३०० विद्यार्थ्यांची ५.५५ किमी लांबीची मानवी साखळी उभारली जाईल. ही साखळी एसआयईएस हायस्कूल, माटुंगा येथून सायनमार्गे किंग्ज सर्कल येथे समाप्त होईल.