आंबेडकर स्मारक रखडले; खर्च वाढल्याने ३५० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित; प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता 
मुंबई

आंबेडकर स्मारक रखडले; खर्च वाढल्याने ३५० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित; प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता

इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम निधीवाढीच्या प्रस्तावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. तांबे आणि कांस्य या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने कंत्राटदाराने ३५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.

Swapnil S

मुंबई : इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य स्मारकाचे काम निधीवाढीच्या प्रस्तावामुळे गेल्या सहा महिन्यांपासून रखडले आहे. तांबे आणि कांस्य या कच्च्या मालाच्या दरात मोठी वाढ झाल्याने कंत्राटदाराने ३५० कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. हा प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित असल्याने स्मारकातील मुख्य पुतळ्याचे काम थांबले असून, प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा कालावधी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पश्चिम आशियातील भू-राजकीय तणावामुळे तांबे आणि कांस्य धातूंच्या किमती भडकल्या असून, जुन्या दरात काम करणे कठीण असल्याचे कंत्राटदाराचे म्हणणे आहे. प्रकल्पातील ग्रंथालय, सभागृह आणि संग्रहालयाचे काम ९५ टक्के पूर्ण झाले असले तरी पुतळ्याचे काम मात्र ठप्प झाल्याने प्रकल्पासमोर मोठा अडथळा उभा राहिला आहे. २०१८ मध्ये या प्रकल्पाचे मूळ कंत्राट ७६३ ते ७८३ कोटी रुपयांचे होते, मात्र आराखड्यातील बदल आणि दरवाढीमुळे प्रकल्पाचा एकूण खर्च आता १,२०० कोटी रुपयांच्या पार जाण्याची चिन्हे आहेत.

स्मारकाच्या विलंबावरून राजकारण तापले

सुधारित आराखड्यानुसार पुतळ्याची उंची २५० फुटांवरून ३५० फूट आणि १०० फुटांच्या चबुतऱ्यासह एकूण ४५० फूट करण्यात आली आहे. दरम्यान, स्मारकाच्या विलंबावरून राजकारण तापले असून, डॉ. आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी, सरकार जाणीवपूर्वक प्रकल्प रखडवत असल्याचा आरोप केला आहे. तर 'सरकार समाजात फूट पाडून राज्य करत असून, श्रीमंतांचा प्रस्ताव असता तर तो तत्काळ मंजूर झाला असता', अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.

‘इंदू मिल’ स्मारक का लांबतेय, सांगा...

तर इंदू मिल स्मारक का लांबतंय? किंवा या प्रकल्पाची किंमत का वाढतेय? हे सरकारने सांगावे. सरकारने आणि जे ट्रस्टवर जे आहेत त्यांनी याबाबत सांगावे. इंदू मिल येथे आंबेडकरांचे स्मारक व्हावे आणि ते लवकरात लवकर व्हावे, ही आमची मागणी आहे. पण जर त्यांच्यासाठी निधी मिळत नसेल तर सरकारने यात लक्ष घालावे’, अशी भूमिका ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी मांडली आहे.

स्मारकाचे काम सरकार पूर्ण करणार

‘इंदू मिल स्मारक प्रकल्पाची किंमत वाढली असली तरी राज्य सरकारने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला आहे. इंदू मिल येथील स्मारकाचा संपूर्ण प्रकल्प आमचे सरकार पूर्ण करणार आहे. काही काळ आवश्यक साहित्य उपलब्ध न झाल्यामुळे कामाला विलंब झाला. मात्र, उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे’, असेही बावनकुळे यांनी स्पष्ट केले.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : बेस्टचा 'कायापालट'; कंत्राटी गाड्यांना आता पूर्णविराम, दहा वर्षांनंतर बेस्ट पुन्हा स्व-मालकीच्या बसखरेदीकडे

नागपूरचे नाव 'दीक्षाभूमी' करा - उद्धव ठाकरे

संवैधानिक मूल्यांनाच आव्हान

Tulsi Vivah 2026 : तुळशीचं लग्न लावताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा; जाणून घ्या शुभमुहूर्त अन् पूजा विधी

आजचे राशिभविष्य, २१ नोव्हेंबर २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत