मुंबई : २०११ मधील बहुचर्चित अँटिलिया स्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला विशेष न्यायालयाने दिलेल्या जामीनाला मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी अंतरिम स्थगिती दिली. वाझेचा दहशत निर्माण करण्याचा हेतू होता आणि तो हत्येचाही आरोपी आहे, असे असताना विशेष न्यायालयाने त्याला जामीन मंजूर करून "पूर्णपणे चूक" केली आहे, असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) उच्च न्यायालयात केला.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबाचे जबाब नोंदवण्यासाठी एनआयए एखाद्या "मुहूर्ताची" वाट पाहत होती का, कथित दहशतवादी धोक्याची पर्वा न करता अंबानी कुटुंब आपले आयुष्य आनंदाने जगत आहे का, अशा पद्धतीचे अनावश्यक शेरे विशेष न्यायालयाने मारल्याचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंग यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सचिन वाझे सध्या ठाणे मध्यवर्ती कारागृहात असून, मंगळवारी विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतरही त्याच्या सुटकेची कायदेशीर औपचारिकता अद्याप पूर्ण झालेली नव्हती. न्या. गिरीश कुलकर्णी आणि न्या. नीला गोखले यांच्या खंडपीठाने एनआयएचे अपील ७ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी ठेवले असून सचिन वाझेला नोटीस बजावली आहे.
विशेष न्यायालयाने २९ सप्टेंबर रोजी दिलेल्या आदेशाला आम्ही अंतरिम स्थगिती देत आहोत. राज्य प्राधिकरणांनी तातडीने आमचा हा आदेश संबंधित कारागृह अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावा, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.