मुंबई : मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या ४६ वर्षीय न्यायमूर्तींची सायबर भामट्यांनी ९३ हजार रुपयांना ऑनलाइन फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मोबाईल दुरुस्तीसाठी बनावट कस्टमर केअर प्रतिनिधीशी संपर्क साधणे न्यायमूर्तींना महागात पडले आहे. याप्रकरणी ताडदेव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार न्यायाधीश हे ताडदेव येथील शासकीय अधिकारी वसाहतीत राहतात. ३० मार्च रोजी त्यांच्या ‘सॅमसंग एस-२२’ मोबाईलच्या स्क्रीनवर एक गुलाबी रेषा दिसू लागली. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी त्यांनी ऑनलाइन शोध घेऊन कस्टमर केअरचा नंबर मिळवला आणि त्यावर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर संध्याकाळी ५:२१ वाजताच्या सुमारास त्यांना एका अज्ञात क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तीने आपण ‘सॅमसंग कस्टमर केअर’मधून बोलत असल्याचे सांगून न्यायमूर्तींचा विश्वास संपादन केला. त्यांना व्हॉट्सॲपवर एक एपीके फाईल पाठवली आणि ते ‘कस्टमर सपोर्ट’ ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले.
तक्रार नोंदवण्याच्या बहाण्याने आरोपीने न्यायमूर्तींना गुगल पेद्वारे १० रुपये दोनदा पाठवण्यास सांगितले. २० रुपयांचा व्यवहार केल्यानंतर आपली तक्रार नोंदवली जात आहे, असे त्यांना वाटले. मात्र, रात्री ९ वाजताच्या सुमारास त्यांनी आपले बँक खाते तपासले असता, त्यांच्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून पहिल्यांदा ९० हजार आणि नंतर ३ हजार असे एकूण ९३ हजार रुपये परस्पर काढल्याचे निदर्शनास आले. ही रक्कम ‘पप्पू सचिन यादव’ नावाच्या यूपीआय आयडीवर वर्ग झाली होती.
सायबर सेलच्या मदतीने तपास सुरू
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने १९३० या सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायमूर्तींनी ते बनावट ॲप डाऊनलोड केल्यामुळे आरोपीला त्यांच्या फोनचा आणि बँकिंग डेटाचा ताबा मिळाला होता. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी एफआयआर नोंदवला असून सायबर सेलच्या मदतीने पुढील तपास सुरू आहे.