मुंबई

Mumbai : केईएमचा ४२२ कोटींचा शैक्षणिक संकुल प्रकल्प; BMC डिसेंबरमध्ये काढणार निविदा

केईएम रुग्णालय लवकरच वैद्यकीय शिक्षण आणि प्रगत क्लिनिकल प्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे. बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयाच्या आवारात ४२२ कोटी खर्चाचे परिचारिका (नर्सिंग) आणि निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) शैक्षणिक संकुल उभारण्याच्या तयारीत आहे.

अमित श्रीवास्तव

मुंबई : केईएम रुग्णालय लवकरच वैद्यकीय शिक्षण आणि प्रगत क्लिनिकल प्रशिक्षणाचे एक प्रमुख केंद्र बनणार आहे. बृहन्मुंबई महापालिका रुग्णालयाच्या आवारात ४२२ कोटी खर्चाचे परिचारिका (नर्सिंग) आणि निमवैद्यकीय (पॅरामेडिकल) शैक्षणिक संकुल उभारण्याच्या तयारीत आहे. या प्रकल्पाची निविदा डिसेंबर २०२६ मध्ये काढण्याचे प्रस्तावित असून यामुळे रुग्णालयात मोठ्या शैक्षणिक पायाभूत सुविधांचा मार्ग मोकळा होणार आहे.

प्रस्तावित संकुलामध्ये एकाच वेळी सुमारे ८०० विद्यार्थ्यांना सामावून घेण्याची क्षमता असेल. सध्याच्या जुन्या नर्सिंग इमारतीच्या जागेवर २८ मजली आणि ३२ मजली अशा दोन गगनचुंबी इमारती उभारल्या जातील. हे संकुल सुमारे ७४,००० चौरस मीटर क्षेत्रफळात पसरलेले असेल. या संस्थेत 'बीएससी नर्सिंग' आणि 'एमएससी नर्सिंग' या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसह विविध निमवैद्यकीय शाखांचे पदवी व पदव्युत्तर वर्ग चालवले जातील.

शैक्षणिक क्षमता वाढेल

केईएम रुग्णालयात १९२६ पासून नर्सिंग शाळा सुरू असून तिथे परिचारिका व प्रसूतीशास्त्राचे (मिडवायफरी) शिक्षण दिले जाते. या नव्या संकुलामुळे रुग्णालयाची शैक्षणिक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि कुशल आरोग्य व्यावसायिक तयार होण्यास मदत होईल.

'बायोस्कील लॅबोरेटरी' केंद्र

रुग्णालय प्रशासनाकडून ₹१७ कोटींच्या अंदाजित खर्चातून पाच मजली विशेष 'बायोस्कील लॅबोरेटरी' विकसित केली जात आहे. शवविच्छेदन (पोस्ट-मॉर्टम) रुग्णालय इमारतीच्या पुनर्विकासाचा एक भाग म्हणून सुमारे २० हजार चौरस फूट जागेत ही सुविधा उभारली जाईल. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून पुढील ११ महिन्यांत बांधकाम पूर्ण होणे अपेक्षित आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

सक्तीची सेवानिवृत्ती शिक्षा नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा

राष्ट्रवादीमध्ये राजकीय हालचालींना वेग; पार्थ यांनी घेतली शरद पवारांची भेट; शशिकांत शिंदे, आव्हाड यांच्या उपस्थितीत चर्चा

पर्यावरण मंत्र्यांचे पर्यावरणाचे ज्ञान शून्य; कर्जतमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचे टीकास्त्र

आणीबाणी ही चूक; सोनिया गांधी यांचे विधान, इंदिराजींनाही खंत वाटल्याचा मुलाखतीत दावा

गोकुळमध्ये रस नाही; सरकारी संचालक नेमण्याच्या आरोपावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा