मुंबई : केईएम रुग्णालयातील बंद लिफ्टचा प्रश्न गुरुवारी स्थायी समितीच्या बैठकीत चांगलाच गाजला. रुग्णालयातील लिफ्ट अनेक दिवस बंद असूनही प्रशासनाला त्याचे गांभीर्य नसल्याने रुग्णांच्या जिवाशी खेळ सुरू असल्याचा संतप्त आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केला. लिफ्टच्या देखभाल-दुरुस्तीतील दिरंगाई, निविदा प्रक्रिया आणि विद्युत व यांत्रिकी विभागाच्या कारभारावर सदस्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संबंधित अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी एकमुखी मागणी करण्यात आली. स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी हा हरकतीचा मुद्दा राखून ठेवत दोषींना सेवेतून बाहेरचा रस्ता दाखवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
शिवसेनेच्या नगरसेविका स्थायी समिती सदस्या यामिनी जाधव यांनी केईएममधील लिफ्ट अनेक दिवस बंद असल्याने रुग्णांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे सांगितले. रुग्णालयात परिचारिकांचीही कमतरता असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. निविदा काढण्यास झालेला विलंब आणि संबंधित कार्यालयाच्या कामकाजाची चौकशी करण्याची मागणी केली. काँग्रेसचे अशरफ आजमी यांनी महापालिका रुग्णालयांच्या दुरवस्थेवर टीका करत रुग्णालयांचे ऑडिट अहवाल, लिफ्टच्या निविदांना झालेला विलंब आणि संबंधितांवरील कारवाईचा तपशील मागितला.
उबाठाचे रमाकांत रहाटे यांनी केईएम हे गोरगरीब रुग्णांचे रुग्णालय असल्याने येथे उत्तम सुविधा मिळणे अपेक्षित असल्याचे सांगितले. मुदतीत मंजुरी मिळूनही २०२६ उजाडले तरी लिफ्टची समस्या कायम राहणे ही गंभीर बाब असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अप गट) सईदा खान यांनी ही समस्या केवळ केईएमपुरती मर्यादित नसून महापालिकेच्या अन्य रुग्णालयांतही लिफ्टच्या समस्या असल्याचे सांगितले.
मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी केईएममधील ११ पैकी केवळ पाच लिफ्ट सुरू असल्याचा मुद्दा उपस्थित केला. यापूर्वी पत्रव्यवहार करूनही प्रशासनाने दखल घेतली नसल्याची टीका त्यांनी केली. लेखी उत्तरांमधून उडवाउडवी केली जात असून प्रशासन जबाबदारी झटकत असल्याचा आरोपही त्यांनी केला. भाजपचे नगरसेवक तथा आरोग्य समिती अध्यक्ष हरिष भांदिर्गे यांनी काही अधिकाऱ्यांनी महापालिकेला बदनाम करण्याची सुपारी घेतली आहे का, असा सवाल केला. विद्युत आणि यांत्रिकी विभागाच्या जबाबदारी निश्चितीची मागणी करत तीन वर्षांत या विभागांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा मागितला. एकाच पदावर तीन ते पाच वर्षे किंवा त्याहून अधिक काळ ठाण मांडून बसलेल्या अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
शिवसेना (उबाठा)च्या श्रद्धा जाधव यांनी रुग्णालयांतील निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नसल्याचा इशारा दिला. सभागृह नेते गणेश खणकर यांनी लिफ्ट बंद असताना प्रशासनातील एकाही कर्मचाऱ्याच्या ते लक्षात कसे आले नाही, असा सवाल केला.
‘दोषींना घरचा रस्ता दाखवा’
प्रत्यक्षात रुग्णांना मूलभूत सुविधांसाठी झगडावे लागणे हे खेदजनक आहे. पूर्वी रुग्णालय अधिष्ठात्यांचा वचक होता; मात्र केईएमसारख्या महत्त्वाच्या रुग्णालयात लिफ्ट बंद असूनही प्रशासनाला त्याची माहिती नसणे ही गंभीर बाब आहे. या प्रकारामुळे महापालिकेची बदनामी होत असून संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करावी, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि गरज पडल्यास त्यांना सेवेतून बाहेरचा रस्ता दाखवावा, असे निर्देश त्यांनी दिले.
केईएममध्ये नवीन लिफ्ट महिन्याभरात
परळ येथील केईएम रुग्णालयातील बंद असलेल्या लिफ्टसंदर्भात मुंबईचे उपमहापौर संजय घाडी यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी उपमहापौर घाडी यांनी केईएमचे अधिष्ठाता डॉ. हरीश पाठक यांच्याशी चर्चा केली. बंद पडलेल्या लिफ्टऐवजी नवीन लिफ्टचे काम महिनाभरात पूर्ण होईल, असे उपमहापौर संजय घाडी यांनी सांगितले. केईएम रुग्णालयातील ज्या विभागाची लिफ्ट बंद आहे ती ३९ वर्षे जुनी होती.