Mumbai : लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशांवर हल्ले; एकाच दिवशी दोन घटनांमध्ये केली मारहाण (संग्रहित छायाचित्र)
मुंबई

Mumbai : लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशांवर हल्ले; एकाच दिवशी दोन घटनांमध्ये केली मारहाण

मुंबई उपनगरीय रेल्वेत विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या डब्यांमधून प्रवास करणे दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालले आहे.

Swapnil S

मेघा कुचिक/मुंबई

मुंबई उपनगरीय रेल्वेत विशेषतः दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव असलेल्या डब्यांमधून प्रवास करणे दिवसेंदिवस असुरक्षित बनत चालले आहे. शनिवारी दिव्यांग प्रवाशांना राखीव डब्यांमध्ये मारहाण झाल्यामुळे दिव्यांगांच्या सुरक्षित प्रवास आणि सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

संजय उगले हे दिव्यांग प्रवासी शनिवारी सीएसएमटी-कल्याण धीम्या लोकलने प्रवास करत होते. ते मुलुंड स्थानकावरून गाडीत चढले. ठाणे स्थानकावर दोन सर्वसामान्य (दिव्यांग नसलेले) प्रवासी दिव्यांग डब्यात शिरले. उगले यांनी हा डबा दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असल्याचे सांगितल्यावर त्यांच्यात वाद झाला. यानंतर दोन्ही पुरुषांनी उगले यांना मारहाण केली. दिवा रेल्वे स्थानकावर एका दुसऱ्या प्रवाशाने उगले यांच्या मदतीसाठी पुढे येत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यालाही मारहाण केली. यानंतर उगले यांनी दिवा स्थानकावरील एका पोलिसाशी (कॉन्स्टेबल) संपर्क साधला; परंतु त्या पोलिसाने दोन प्रवाशांवर कोणतीही कारवाई केली नाही आणि उलट स्वतः प्रथम श्रेणीच्या (फर्स्ट क्लास) डब्यात बसून निघून गेला, असा आरोप उगले यांनी केला आहे. ही घटना रात्री ११.५४ च्या सुमाराला घडली. उगले म्हणाले, मी फक्त त्यांना सांगितले की, हा डबा दिव्यांगांसाठी राखीव आहे, पण त्यांना या गोष्टीचा राग आला आणि त्यांनी मला मारहाण केली. खूप रात्र झाली असल्याने, मी सोमवारी ठाणे लोहमार्ग पोलिसांत (जीआरपी) तक्रार दाखल करणार आहे.

महिला प्रवाशाने सहकाऱ्यांच्या मदतीने केली मारहाण

शनिवारी घडलेल्या दुसऱ्या घटनेत, सकाळी ८.३६ च्या कर्जत-सीएसएमटी लोकलच्या दिव्यांग डब्यातून एक सर्वसामान्य महिला प्रवास करत होती. ती डोंबिवली स्थानकावरून डब्यात चढली असता, दिव्यांग प्रवाशांनी तिला हा डबा केवळ दिव्यांगांसाठीच राखीव असल्याची माहिती दिली. त्या महिलेने आपल्या हाताला फ्रॅक्चर असल्याचे सांगितले. त्यामुळे प्रवाशांनी तिला संबंधित वैद्यकीय कागदपत्रे दाखवण्याची विनंती केली. या विनंतीमुळे संतप्त झालेल्या महिलेने दिव्यांग प्रवासी अनिल गंगावणकर यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर कुर्ला स्थानकावर तिचे दोन सर्वसामान्य सहकारी डब्यात शिरले आणि त्यांनी गंगावणकर यांना मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, रेल्वे पोलिसांनी गंगावणकर यांच्याशी संपर्क साधून तक्रार नोंदवण्यास सांगितले.

केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना पत्र

दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये वाढणारे अतिक्रमण, गैरवर्तन आणि मारहाणीच्या घटनांवर चिंता व्यक्त करत सामाजिक कार्यकर्ते नितीन गायकवाड यांनी या विरोधात आवाज उठवला आहे. स्वतः दिव्यांग प्रवासी असलेले आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्यांवर काम करणाऱ्या गायकवाड यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मध्य व पश्चिम रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष, डीआरएम आणि रेल्वे पोलीस आयुक्तांना ई-मेलद्वारे तक्रार सादर केली आहे. आजकाल दिव्यांग प्रवाशांचे राखीव डबे सुरक्षित प्रवासाच्या जागा राहण्याऐवजी हिंसाचार, अतिक्रमण आणि धमकावण्याचे केंद्र बनले आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.

साखळी ओढल्याप्रकरणी दिव्यांगावरच गुन्हा

दिवा येथील रामदयाल गुप्ता या दिव्यांग प्रवाशाला दिव्यांग डब्यात मारहाण करण्यात आली होती. गुप्ता यांनी साखळी ओढली होती आणि रेल्वे सुरक्षा दलाने आरोपींना ताब्यात घेतले होते. मात्र, गुप्ता यांच्यावरच साखळी ओढल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. गुप्ता यांनी या आधीही आपल्याला मारहाण झाल्याचे सांगितले, ज्यात एका घटनेत आरपीएफ कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Maharashtra MLC Elections : राज्यातील विधान परिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Mumbai Ganeshotsav 2026 : अवघ्या '१ इंच'चा बाप्पा; शिवलिंगात विराजमान झालेल्या गणरायाचा Video व्हायरल

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणातील CCTV फुटेज पोलिसांच्या हाती; परीक्षा केंद्रातील 'त्या' १५ मिनिटांत नेमकं काय घडलं?

Bihar Viral Video : अल्पवयीन विद्यार्थिनीला घेरून गैरवर्तन; मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

सोनिया गांधी मतदार यादी प्रकरणाला नवे वळण; कायदेशीर त्रुटींमुळे कनिष्ठ न्यायालयाचा आदेश रद्द, तक्रारीवर नव्याने सुनावणी