मुंबई : लोकलमध्ये चुकून लेडीज डब्यात चढलेल्या एका तरुणाला आपण चुकीच्या डब्यात आल्याचे समजताच धावत्या ट्रेनमधून उडी मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा हा धोकादायक प्रयत्न पाहून महिला प्रवाशांनी त्याला पकडून रोखले. पुढील स्थानक येईपर्यंत महिलांनी त्याला डब्यातच थांबवले. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
लेडीज डब्यात चढला अन्...
व्हायरल व्हिडीओमध्ये हा तरुण चुकून महिलांच्या डब्यात चढल्याचे लक्षात आल्यानंतर घाबरलेला दिसत आहे. काही महिला प्रवाशांनी त्याला त्याची चूक लक्षात आणून दिली. त्यानंतर तरुणाने धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न केला.
महिलांनी उडी मारण्यापासून थांबवले
धावत्या ट्रेनमधून उडी मारण्याच्या प्रयत्नात असताना महिलांनी तरुणाला पकडून मागे ओढले. त्याला गंभीर दुखापत होण्याची शक्यता असल्याने महिलांनी त्याला असे न करण्यास सांगितले. व्हिडीओमध्ये तरुण हात जोडून वारंवार माफी मागताना दिसतो. पुढील स्थानक येईपर्यंत तो डब्यातच थांबला आणि त्यानंतर ट्रेनमधून उतरला.
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. घाईच्या नादात किंवा गर्दीमुळे प्रवाशांकडून अशा चुका होऊ शकतात, अशा प्रतिक्रिया काही सोशल मीडिया युजर्सने दिल्या आहेत. मात्र, चालत्या लोकलमधून उतरण्याचा किंवा उडी मारण्याचा प्रयत्न किती धोकादायक ठरू शकतो, याकडेही या घटनेमुळे लक्ष वेधले गेले आहे.
लोकलमधील भांडणाचाही व्हिडीओ व्हायरल
काही दिवसांपूर्वी मुंबई लोकलमधील पुरुषांच्या डब्यातील दोन प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. दोघांनी एकमेकांना मारहाण केल्याचे व्हिडीओमध्ये दिसत होते. दोघांमध्ये हाणामारी सुरू असताना इतर प्रवाशांनी हस्तक्षेप करून त्यांना वेगळे केले. मात्र, त्यानंतरही दोघे एकमेकांना शिवीगाळ करत होते. हा प्रकार नेमक्या कोणत्या लोकलमध्ये घडला आणि भांडणाचे कारण काय होते, याची माहिती समोर आलेली नाही.
मुंबईची लोकल लाखो प्रवाशांचा आधार
मुंबईची लोकल रेल्वे ही शहराची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी लोकलने प्रवास करतात. सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेत लोकलमध्ये मोठी गर्दी असते. त्यामुळे जागेवरून किंवा इतर किरकोळ कारणांवरून प्रवाशांमध्ये वाद होण्याच्या घटनाही घडतात. अशातच, लोकलमध्ये चुकून लेडीज डब्यात चढलेल्या तरुणाला महिलांनी जाब न विचारता समजावून सांगितले. धावत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न न करता पुढील स्थानकापर्यंत थांबण्याचा सल्लाही त्यांनी दिला. महिलांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर महिलांच्या या कृतीचे कौतुक होत आहे.