Mumbai Local Update : उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील अनेक लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai Local Update : उद्या मध्य रेल्वेचा मेगाब्लॉक; तिन्ही मार्गांवरील अनेक लोकल रद्द, जाणून घ्या वेळापत्रक

मुख्य आणि हार्बर मार्गासोबतच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवांवरही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई : मुंबईकरांचा उद्याचा (रविवार, दि. १५) लोकल प्रवास काहीसा रखडण्याची शक्यता आहे. मध्य रेल्वेने मुख्य, हार्बर आणि ट्रान्सहार्बर या तिन्ही मार्गांवर देखभाल व दुरुस्तीच्या कामांसाठी मेगाब्लॉक जाहीर केला आहे. ठाणे-कल्याण आणि पनवेल-वाशी स्थानकांदरम्यान हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून, काही लोकल पर्यायी मार्गावरून वळवण्यात येतील. त्यामुळे रविवारी लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी घराबाहेर पडण्यापूर्वी वेळापत्रक तपासावे.

मुख्य मार्गावर ठाणे-कल्याणदरम्यान मेगाब्लॉक

मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.

या काळात मुलुंडहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.५३ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन धीम्या आणि अर्धजलद लोकल मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा आणि डोंबिवली स्थानकांवर थांबतील. त्यामुळे या लोकल आपल्या नियोजित वेळेपेक्षा सुमारे १० मिनिटे उशिराने गंतव्यस्थानी पोहोचतील.

त्याचप्रमाणे, कल्याणहून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.५१ या वेळेत सुटणाऱ्या अप धीम्या आणि अर्धजलद लोकल कल्याण ते मुलुंडदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल डोंबिवली, दिवा, मुंब्रा, कळवा आणि ठाणे स्थानकांवर थांबतील. मुलुंड येथे या लोकल पुन्हा अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकलदेखील सुमारे १० मिनिटे उशिराने धावतील.

याशिवाय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत सुटणाऱ्या आणि तेथे पोहोचणाऱ्या अप व डाऊन धीम्या मार्गावरील सर्व उपनगरीय लोकल सुमारे १० मिनिटे उशिराने धावतील. मात्र, ठाणे उपनगरीय लोकल सेवा नियोजित डाऊन धीम्या मार्गावरूनच सुरू राहणार आहेत.

हार्बर मार्गावर पनवेल-वाशीदरम्यान ब्लॉक

हार्बर मार्गावर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५ या वेळेत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमधून पोर्ट मार्ग वगळण्यात आला आहे. या कालावधीत पनवेलहून सीएसएमटीच्या दिशेने सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.

तसेच सीएसएमटीहून बेलापूर आणि पनवेलच्या दिशेने सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल सेवाही बंद राहतील.

ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलही रद्द

मुख्य आणि हार्बर मार्गासोबतच ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल सेवांवरही या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

पनवेलहून ठाण्याच्या दिशेने सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ या वेळेत सुटणाऱ्या अप ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील. तर ठाण्याहून पनवेलच्या दिशेने सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० या वेळेत सुटणाऱ्या डाऊन ट्रान्सहार्बर लोकल सेवाही बंद ठेवण्यात येतील.

प्रवाशांसाठी पर्यायी लोकल सेवा

मेगाब्लॉकच्या काळात प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी सीएसएमटी ते वाशी दरम्यान विशेष उपनगरीय लोकल चालवण्यात येतील. ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते वाशी आणि ठाणे ते नेरूळदरम्यान लोकल सेवा उपलब्ध असतील. तसेच पोर्ट मार्गावरील लोकल नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. त्यामुळे रविवारी ठाणे, कल्याण, पनवेल, वाशी, बेलापूर आणि सीएसएमटीदरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मेगाब्लॉकच्या वेळा लक्षात घेऊनच प्रवासाचे नियोजन करावे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Surat Fire : सुरतमधील कापडाच्या गोदामाला भीषण आग; परिसरात धुराचे प्रचंड लोट, घटनेचा Video समोर

Microsoft Global Outage : जगभरातील युजर्सना मोठा दिलासा! मायक्रोसॉफ्टच्या सर्व सेवा सुरू, कंपनीकडून दिलगिरी व्यक्त

पुणे-नागपूर ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात; पुलाच्या कठड्याला धडकून बस नाल्यात, प्रवाशांना काचा फोडून बाहेर काढलं, एकाचा मृत्यू

सोन्याचे दर सलग चौथ्या दिवशी घसरले; तोळ्यामागे २५०० रुपयांची घट

US Flight Chaos : अमेरिकेची विमानसेवा ठप्प; लाखो प्रवाशांचे हाल, नेमकं काय घडलं?