मुंबई : उद्या बाहेर जाण्याचा, फिरायला जाण्याचा किंवा काही कामासाठी लोकलने प्रवास करण्याचा विचार करत असाल, तर थोडं थांबा! कारण, उद्या म्हणजेच रविवार, २९ नोव्हेंबर रोजी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर विविध दुरुस्तीची कामे होणार आहेत. यासाठी मध्य रेल्वे आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार असून पश्चिम रेल्वेवर रात्री ब्लॉक असेल. त्यामुळे काही लोकल फेऱ्यांवर परिणाम होईल, त्यामुळे प्रवाशांनी घराबाहेर पडण्याआधी वेळापत्रक तपासणे आवश्यक आहे.
मध्य रेल्वेवर कुठे आणि किती वाजता मेगाब्लॉक?
मध्य रेल्वेवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) ते विद्याविहार स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
या कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान धावणाऱ्या धीम्या लोकल जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर विद्याविहार स्थानकात पुन्हा धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
तर सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल विद्याविहार स्थानकात जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा या स्थानकांवर थांबतील. त्यानंतर पुढे सीएसएमटीच्या दिशेने रवाना होतील.
ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवांमध्ये बदल
ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे ठाणे ते वाशी, नेरूळ आणि पनवेलदरम्यान धावणाऱ्या तसेच या स्थानकांहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या लोकल सेवा रद्द राहतील.
मात्र, हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते गोरेगाव आणि सीएसएमटी ते पनवेलदरम्यानच्या लोकल सेवा रविवारच्या वेळापत्रकानुसार सुरू राहतील. तसेच नेरूळ/बेलापूर ते उरणदरम्यानच्या पोर्ट मार्गावरील लोकलही नेहमीच्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावतील.
पश्चिम रेल्वेवर मध्यरात्री दुरुस्तीची कामे
पश्चिम रेल्वेवर सांताक्रूझ ते माहीम स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गांवर शनिवार आणि रविवारच्या मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. या कालावधीत चर्चगेट ते अंधेरीदरम्यान धावणाऱ्या जलद लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.
दरम्यान, पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दिवसा उपनगरीय रेल्वे मार्गावर कोणताही मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिवसा नियमित लोकल सेवा उपलब्ध राहतील.