मेट्रोमुळे रेल्वेचे प्रवासी घटले! पहिल्या तिमाहीत लोकलच्या प्रवाशांमध्ये ४४.६५ लाखांची घट; AC लोकलच्या प्रवाशांमध्ये ४१ लाखांची भरघोस वाढ 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

मेट्रोमुळे रेल्वेचे प्रवासी घटले! पहिल्या तिमाहीत लोकलच्या प्रवाशांमध्ये ४४.६५ लाखांची घट; AC लोकलच्या प्रवाशांमध्ये ४१ लाखांची भरघोस वाढ

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल ४४.६५ लाख प्रवाशांची निव्वळ घट नोंदवण्यात आली आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक/मुंबई

मुंबई उपनगरीय रेल्वेच्या प्रवाशांमध्ये चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत गेल्या वर्षाच्या याच कालावधीच्या तुलनेत तब्बल ४४.६५ लाख प्रवाशांची निव्वळ घट नोंदवण्यात आली आहे. समांतर मार्गांवर सुरू झालेल्या मेट्रो सेवांमुळे लोकल प्रवाशांची संख्या घटल्याचे प्राथमिक विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे.

पश्चिम रेल्वेच्या ‘मुंबई सेंट्रल विभागा’ने तयार केलेल्या अंतर्गत कामगिरी अहवालानुसार, एप्रिल ते जून या कालावधीत उपनगरीय प्रवाशांची एकूण संख्या २६.०४ कोटींवरून २५.६० कोटींवर खाली आली असून, यात १.७१ टक्क्यांची घट झाली आहे. मुख्यत्वे बोरिवली-दहिसर आणि अंधेरी या भागातील मेट्रो मार्गांमुळे हा परिणाम झाल्याचे रेल्वेचे म्हणणे आहे.

द्वितीय श्रेणीच्या प्रवाशांची संख्या २१.९४ कोटींवरून २१.२८ कोटींवर (३ टक्के घट) तर प्रथम श्रेणीच्या प्रवाशांची संख्या २.७४ कोटींवरून २.५४ कोटींवर (७.२३ टक्के घट) खाली आली आहे.

दुसरीकडे, वातानुकूलित (एसी) लोकल प्रवाशांच्या संख्येत मात्र लक्षणीय वाढ झाली आहे. एसी लोकलच्या प्रवाशांची संख्या १.३७ कोटींवरून १.७८ कोटींवर पोहोचली असून, या तिमाहीत सुमारे ४१ लाख प्रवाशांची भर पडली आहे. तथापि, ही वाढ नवीन प्रवाशांची आहे की प्रथम किंवा द्वितीय श्रेणीतील प्रवाशांनी एसी लोकलचा पर्याय निवडल्यामुळे झाली आहे, हे रेल्वेच्या आकडेवारीतून स्पष्ट झालेले नाही.

पश्चिम रेल्वेच्या विश्लेषणात नमूद करण्यात आलेली मेट्रोची आकडेवारी अधिकृत मेट्रो आकडेवारीऐवजी प्रसारमाध्यमांतील वृत्तांवर आधारित आहे. त्यामुळे तिची पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत आकडेवारीशी थेट तुलना करणे कठीण आहे.

पश्चिम रेल्वेने विशेषतः अंधेरी स्थानकाचा उल्लेख केला आहे. येथे प्रथम श्रेणीच्या प्रवासाच्या तिकीट विक्रीत १५.०२ टक्के, तर द्वितीय श्रेणीच्या प्रवासाच्या तिकीट विक्रीत ६.५१ टक्के घट झाली. कुलाबा आणि सिद्धिविनायक मंदिराच्या दिशेने जाणारे प्रवासी ॲॅक्वा लाइनचा पर्याय निवडत असल्यामुळे ही घट झाल्याचे विश्लेषणात नमूद करण्यात आले आहे. या प्रवृत्तीवरून मेट्रोची स्पर्धा वाढत असल्याचे दिसत असले, तरी प्रत्यक्षात किती उपनगरीय रेल्वे प्रवाशांनी मेट्रोकडे आपला प्रवास वळवला, हे उपलब्ध आकडेवारीवरून निश्चितपणे सांगता येत नाही.

महालक्ष्मी आणि प्रभादेवी स्थानकांवर सीझन तिकीट विक्रीतही लक्षणीय घट झाली. महालक्ष्मी येथे प्रथम श्रेणीच्या सीझन तिकिटांची विक्री २८.१७ टक्क्यांनी, तर प्रभादेवी येथे २७.७२ टक्क्यांनी घटली. द्वितीय श्रेणीच्या प्रवासाच्या तिकिटांमध्ये प्रभादेवीत २३.०२ टक्के, तर महालक्ष्मी येथे १९.४६ टक्के घट झाली. दोन्ही स्थानकांवर द्वितीय श्रेणीच्या सीझन तिकिटांच्या विक्रीत अनुक्रमे २६.५७ टक्के आणि २६.७० टक्के घट झाली.

त्याचवेळी, काही स्थानकांवर एसी लोकलमधील प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. लोअर परळ येथे एसी प्रवासाच्या तिकिटांमध्ये १७५ टक्के वाढ झाली. त्यानंतर राम मंदिरमध्ये १५६ टक्के, गोरेगावमध्ये १२७ टक्के आणि खार रोड येथे ११५ टक्के वाढ झाली. गोरेगावमध्ये एसी सीझन तिकिटांच्या विक्रीतही १६४.५० टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली.

मेट्रोशी वाढती स्पर्धा

पश्चिम रेल्वेच्या विश्लेषणानुसार, प्रवासी संख्येत झालेल्या कपातीमागे मेट्रोच्या विस्ताराचाही एक महत्त्वाचा घटक आहे. बोरिवली-दहिसर उपनगरीय मार्गाच्या काही भागांना समांतर धावणाऱ्या यलो आणि रेड मेट्रो मार्गांवर एप्रिल ते जूनदरम्यान २.२६ कोटी प्रवाशांनी प्रवास केला. म्हणजेच दररोज सरासरी सुमारे २.४८ लाख प्रवासी या मार्गांचा वापर करत होते. तर अंधेरी-चर्चगेट-कुलाबा मार्गाच्या काही भागांना समांतर असलेल्या ॲॅक्वा लाइनवर १.६५ कोटी प्रवासी प्रवास करत होते. या मार्गावर दररोज सरासरी १.८२ लाख प्रवासी होते. या दोन्ही मेट्रो मार्गांवर मिळून या तिमाहीत ३.९१ कोटी प्रवासांची नोंद झाली.

महालक्ष्मी, प्रभादेवीत मोठी घट

ॲॅक्वा लाइनच्या मार्गालगत असलेल्या अनेक स्थानकांवर प्रवासी तिकीट विक्रीत मोठी घट झाली आहे. प्रथम श्रेणीच्या प्रवासाच्या तिकिटांमध्ये महालक्ष्मी स्थानकावर १९.१८ टक्के घट झाली. त्यापाठोपाठ मरीन लाइन्समध्ये १५.६६ टक्के, अंधेरीत १५.०२ टक्के, मीरा रोडमध्ये १३.३२ टक्के आणि प्रभादेवीत १२.२६ टक्के घट नोंदवण्यात आली.

एसी लोकल सेवा वाढविण्यावर पश्चिम रेल्वेचा भर

या परस्परविरोधी प्रवृत्तींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेने एसी उपनगरीय सेवांचा विस्तार अधिक वेगाने करण्याची शिफारस केली आहे. पश्चिम रेल्वेच्या अंतर्गत विश्लेषणानुसार, दररोज आणखी ४५ हजार प्रवासी एसी ईएमयू सेवांची निवड करत आहेत. विद्यमान प्रवाशांना टिकवून ठेवणे, नव्या प्रवाशांना आकर्षित करणे आणि उपनगरीय रेल्वेच्या प्रवासी संख्येत आणखी होणारी घट रोखणे यासाठी एसी लोकलच्या अधिक फेऱ्या सुरू करणे ही धोरणात्मक गरज असल्याचे विश्लेषणात म्हटले आहे.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mumbai : आजपासून रिक्षा, टॅक्सी प्रवास महागणार; भाड्यात १ ते २ रुपयांची वाढ

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा; मुख्यमंत्री फडणवीसांचे पुणेकरांना आवाहन

राज्यातील २ कोटी ६ लाख मतदार वगळले; महाराष्ट्राची प्रारुप मतदार यादी जाहीर; १७ लाख दुबार, तर ३४ लाख मृत्यू झालेले मतदार

मुंबईकडे जाण्याची तयारी करा; मनोज जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन

होऊ दे खर्च! फडणवीस, शिंदे, पवारांच्या बंगल्यांमध्ये ‘पाहुणचार’; अडीच वर्षांत २१ कोटींची उधळण, फडणवीसांपेक्षा शिंदेंचा खर्च दुप्पट