मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मध्य रेल्वे विस्कळीत झाल्यामुळे चाकरमान्यांचे हाल झाले आहेत. आज, १३ मे रोजी सकाळी ठाण्याजवळ सिग्नल यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने कल्याण ते कुर्लादरम्यान मध्य रेल्वेची सेवा प्रभावित झाल्यामुळे रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. "ठाण्याला सिग्नलमध्ये बिघाड झाल्यामुळे कल्याण ते कुर्ला दरम्यानच्या लोकल सेवेवर परिणाम झाला. लोकल सेवा पूर्ववत करण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत", असे मध्य रेल्वेच्यावतीने सांगण्यात आले होते. त्यानंतर, सकाळी १०: १५ वाजता मध्य रेल्वेची सेवा पूर्ववत झाली असून सर्व लोकल आणि मेल एक्स्प्रेस गाड्या सुरळीत सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे.
तथापि, लोकल अदयापही विलंबाने धावत असल्याची तक्रार अनेक प्रवासी सोशल मीडियावर करीत आहेत. या बिघाडामुळे सकाळी सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या चाकरमान्यांचे आणि विद्यार्थ्यांचे हाल होत असल्याचं पाहायला मिळत आहे.