मुंबई : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी मुंबईतील चाकरमान्यांना लोकलच्या खोळंब्याचा मोठा फटका बसला. सकाळी ऐन गर्दीच्या वेळेत पश्चिम रेल्वेच्या मार्गावर विविध ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्याने लोकल वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली, तर मध्य रेल्वेच्या मुलुंड स्थानकाजवळ ओव्हरहेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे डाऊन मार्गावरील लोकल सेवांवर काही काळ परिणाम झाला. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहाेचण्यासाठी घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांना बराच वेळ प्लॅटफॉर्मवरच ताटकळत राहावे लागल्याने अनेक स्थानकांवर आणि लोकलमध्ये तोबा गर्दी झाली होती.
पश्चिम रेल्वेच्या विविध मार्गांवर पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने काही लोकल गाड्या पहाटेपासूनच उशिराने धावत होत्या. वसई रोड येथे पहाटे ४.४६ वाजल्यापासून दिवा डाऊन आणि अप फास्ट मार्गावरील १११/११२ पॉइंटमध्ये तांत्रिक बिघाड झाला. हा बिघाड दुरुस्त करण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांकडून पॉइंट क्लॅम्पिंगचे काम सुरू करण्यात आले. त्यामुळे अप जलद लोकल वाहतुकीवरील खोळंब्यामुळे परिणाम झाला.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला बिघाड दुरुस्त
त्यानंतर दादर स्थानकात सकाळी १०.१० वाजता अप फास्ट आणि डाऊन फास्ट मार्गावरील पॉइंट क्रमांक १४३/१४४ रिव्हर्सवरून नॉर्मल स्थितीत न आल्याने तांत्रिक अडचण निर्माण झाली. रेल्वे कर्मचाऱ्यांकडून हा बिघाड दुरुस्त करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले. गोरेगाव येथेही सकाळी १०.२२ वाजता अप आणि डाऊन हार्बर मार्गावरील पॉइंट क्रमांक १२७/१२८ आणि १२९/१३० मध्ये बिघाड झाला. या तांत्रिक समस्येमुळे गोरेगाव आणि अंधेरीदरम्यानच्या लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
प्रवाशांना होती ‘लेट मार्क’ची चिंता
प्रवाशांची मोठी गर्दी झाल्याने स्थानकांवरही मोठा गोंधळ निर्माण झाला. त्यावेळी पश्चिम रेल्वेवरील वाहतूक साधारण ४० ते ४५ मिनिटे उशिराने सुरू होती. चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या अनेक लोकल उशिराने धावत होत्या. काही जलद मार्गावरील लोकल धीम्या मार्गावर वळवण्यात आल्याने प्रवाशांना आणखी विलंबाचा सामना करावा लागला. आठवड्याच्या सुरुवातीलाच लोकलचे वेळापत्रक कोलमडल्याने चाकरमान्यांना ‘लेट मार्क’ची चिंता सतावत होती.
सेवा पूर्वपदावर येण्यास लागला काही काळ
या तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ठाणे ते ‘सीएसएमटी’ स्थानकां दरम्यान धीम्या मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला. दुरुस्तीचे काम पूर्ण झाल्यानंतरही सेवा पूर्वपदावर येण्यासाठी काही वेळ लागला. मध्य रेल्वेवर कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल सुमारे ३० मिनिटे उशिराने, तर ‘सीएसएमटी’च्या दिशेने जाणाऱ्या धीम्या लोकल २० ते २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे रुळांवर एकामागोमाग एक लोकल उभ्या राहिल्याने प्रवाशांना मोठ्या गर्दीचा आणि विलंबाचा सामना करावा लागला.
४५ लोकल फेऱ्या झाल्या रद्द
वसई रोड, दादर आणि गोरेगाव येथे तीन ठिकाणी पॉइंट यंत्रणेत बिघाड झाल्याने उपनगरी सेवा विस्कळीत झाली. यामुळे सुमारे ४५ लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागल्या. तर शंभरहून अधिक लोकल विलंबाने धावल्याने सकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांचे हाल झाले. दादर स्थानकात पॉइंटमध्ये बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेच्या काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीत बदल करण्यात आला. गोरेगाव येथे हार्बर मार्गावरील अप आणि डाउन दिशेच्या पॉइंटमध्ये सकाळी १०.२२ वाजता बिघाड झाला. त्यामुळे हार्बर मार्गावरील लोकल वाहतुकीवर परिणाम झाला.
मध्य रेल्वेच्या उपनगरी गाड्यांना फटका
एकीकडे पश्चिम रेल्वे वरील प्रवाशी सकाळपासून अडचणींना सामोरे जात होते. अशीच काहीशी परिस्थिती मध्य रेल्वेवर निर्माण झाली. मुलुंड स्थानकाजवळ दुपारी ओव्हरहेड वायरला आग लागली. दुपारी १२ वाजून १७ मिनिटांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या. या घटनेमुळे तीन उपनगरी गाड्यांना फटका बसला. या उपनगरी गाड्या १० ते २० मिनिटे विलंबाने धावल्या.
मुलुंडजवळ ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड
मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही याच काळात तांत्रिक बिघाडाचा फटका बसला. मुलुंड स्थानकाजवळ ‘एमआरव्हीसी’च्या कामादरम्यान एखादी वायर ओव्हरहेड वायरवर पडल्यामुळे हा बिघाड झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, नेमके कारण तपासणीनंतरच स्पष्ट होणार आहे. घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने तपासणी सुरू केली. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत संबंधित मार्गावरील तांत्रिक यंत्रणेची पाहणी करून दुरुस्तीचे काम हाती घेतले.