मुंबई

Mumbai Mega Block Update : पश्चिम रेल्वेवर आज व उद्या रात्री ब्लॉक; ३०० हून अधिक लोकल होणार रद्द

मिठी नदीवरील रेल्वेपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असून या कामासाठी पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मिठी नदीवरील रेल्वेपुलाच्या पुनर्बांधणीचे काम सुरू असून या कामासाठी पश्चिम रेल्वेने माहीम आणि वांद्रे स्थानकादरम्यान दोन दिवस रात्रकालीन ब्लॉक घेतला आहे. शुक्रवारी आणि शनिवारी रात्री हा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेच्या ३०० हून अधिक लोकल रद्द करण्यात येणार आहेत. याचा परिणाम लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांवरही होणार आहे.

मिठी नदीवरील रेल्वे पुलाच्या पुनर्बांधणीचे काम गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी यापूर्वीही पश्चिम रेल्वेने ब्लॉक घेतला होता. या पुलाची कामे करण्यासाठी शुक्रवार आणि शनिवारी रात्री ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेने ३३४ लोकल फेऱ्या रद्द केल्या आहेत. तर प्रवाशांच्या सोयीसाठी लोकलच्या ११० विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे सुमारे २२४ लोकल फेऱ्या ब्लॉक कालावधीत रद्द राहणार आहेत.

शुक्रवारी, ११ एप्रिल रोजी पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाउन धीम्या मार्गावर रात्री ११ ते शनिवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. तर पश्चिम रेल्वेच्या अप आणि डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री १२.३० ते शनिवारी सकाळी ६.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. शुक्रवारी रात्री १०.२३ ते रात्री ११.५८ वाजेपर्यंत चर्चगेट स्थानकातून सुटणाऱ्या सर्व डाऊन धीम्या आणि चर्चगेटच्या दिशेला येणाऱ्या सर्व अप धीम्या लोकल मुंबई सेंट्रल ते सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावरुन चालविण्यात येतील. या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकात थांबणार नाहीत.

शुक्रवारचा ब्लॉक

- शुक्रवारी रात्री १०.२३ वाजता चर्चगेटवरून शेवटची धीमी लोकल भाईंदरसाठी सुटेल.

- शुक्रवारी रात्री ११.४० वाजता चर्चगेटवरून शेवटची जलद लोकल विरारसाठी सुटेल.

- चर्चगेटवरून विरारसाठी रात्री ११.५८ वाजता सुटणारी लोकल मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावर धावेल. त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहीम आणि खार रोड स्थानकांवर थांबणार नाही.

- शुक्रवारी बोरिवलीहून शेवटची धीमी लोकल चर्चगेटसाठी रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही लोकल सुटल्यानंतर ब्लॉक कालावधीतील उर्वरित लोकल सांताक्रूझ आणि मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर धावतील. त्यामुळे खार रोड, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाहीत.

- शुक्रवारी १२.०५ वाजता विरार-चर्चगेट शेवटची लोकल धावेल.

- ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते दादर दरम्यान जलद मार्गावर लोकल चालवल्या जातील.

- ब्लॉक काळात गोरेगाव ते वांद्रेदरम्यान लोकल हार्बर मार्गावर चालवल्या जातील.

- विरार ते अंधेरीदरम्यान लोकल धीम्या आणि जलद मार्गावर चालवल्या जातील.

- शनिवारी पहाटे ०५:४७ वाजता विरार ते चर्चगेट पहिली लोकल सुटेल.

- शनिवारी सकाळी ६.१० वाजता भाईंदर स्थानकातून पहिली चर्चगेट लोकल रवाना होईल. ही लोकल सांताक्रूझ ते मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरुन धावेल. त्यामुळे ती खार रोड, माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ आणि महालक्ष्मी स्थानकांवर थांबणार नाही.

- शनिवार बोरिवली ते चर्चगेटदरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी ८.०३ वाजता सुटेल.

- चर्चगेट स्थानकातून पहिली जलद लोकल सकाळी ६.१४ वाजता बोरिवलीकरिता सुटेल. मुंबई सेंट्रल आणि सांताक्रूझदरम्यान जलद मार्गावर धावेल आणि त्यामुळे महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी, माटुंगा रोड, माहिम आणि खार रोड स्थानकांवर थांबणार नाही.

- चर्चगेट - विरार पहिली जलद लोकल सकाळी ६.१५ सुटेल

- चर्चगेट -बोरिवलीदरम्यान पहिली धीमी लोकल सकाळी ८.०३ वाजता सुटेल.

शनिवारचा ब्लॉक

शनिवारी १२ एप्रिल रोजी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. तर अप जलद मार्गावर शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत चर्चगेट ते दादरदरम्यान लोकल जलद मार्गावर धावतील. तसेच ब्लॉक कालावधीत शनिवार रात्री/रविवार सकाळी डहाणू रोड, विरार, नालासोपारा, वसई रोड, भाईंदर, बोरिवली वरून सुटणाऱ्या लोकल अंधेरीपर्यंत धावतील. तसेच गोरेगाव ते वांद्रे/ माहीम दरम्यानची लोकल सेवा हार्बर मार्गावर चालवण्यात येतील.

- शनिवारी रात्री १०.५३ वाजता चर्चगेट ते विरार शेवटची लोकल असेल.

- शनिवारी रात्री १०.४९ वाजता बोरिवली ते चर्चगेट ही शेवटची धीमी लोकल असेल.

- शनिवारी रात्री १०.२४ वाजता विरारवरून चर्चगेटला जाणारी शेवटची जलद लोकल असणार आहे.

- शनिवारी रात्री १२.०५ वाजता विरारवरून वांद्रेला जाणारी शेवटची लोकल असणार आहे.

- शनिवारी रात्री ११.०५ वाजता चर्चगेट ते विरारपर्यंतची शेवटची जलद लोकल चालविण्यात येईल.

- शनिवारी रात्री १२.११ वाजता माहिमवरून शेवटची हार्बर मार्गावरील लोकल गोरेगावसाठी असेल.

- शनिवारी रात्री १.३० वाजता वांद्रे ते विरार ही शेवटची लोकल असेल.

- रविवारी सकाळी ८.०८ वाजता विरार ते चर्चगेट पहिली धीमी लोकल असेल.

- रविवारी सकाळी ८.१४ वाजता वसई रोड ते चर्चगेट पहिली लोकल असेल.

- रविवारी सकाळी ८.१८ वाजता विरार ते चर्चगेट पहिली जलद लोकल चालविण्यात येईल.

- रविवारी सकाळी ८.२४ वाजता भाईदर ते चर्चगेट पहिली लोकल असेल.

- रविवारी सकाळी ९.०३ वाजता चर्चगेट ते विरार पहिली जलद लोकल असणार आहे.

- चर्चगेटहून बोरिवलीला जाणारी पहिली धीमी लोकल सकाळी ९.०४ वाजता असेल.

प्रवाशांसाठी बेस्टच्या जादा बसेस सोडणार

माहीम ते वांद्रे स्थानकादरम्यान पुलाचा गर्डर टाकण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येत असून ब्लॉक कालावधीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी बेस्टच्या जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत. ओशिवरा, वडाळा, सांताक्रूझ, वांद्रे, खोदादाद सर्कल, अंधेरी पश्चिम बसस्थानक‌‌‌, कुलाबा, दिंडोशी, माहीम, वरळीदरम्यान या जादा बसेस शुक्रवार व शनिवारी चालवण्यात येणार आहेत.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’