मुंबई : मुंबई लोकलमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बोरिवली-विरार लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या २० वर्षीय विवाहित महिलेसोबत एका व्यक्तीने छेडछाड केल्याचा आरोप आहे. महिलेने या गैरवर्तनाला विरोध करत त्याला जाब विचारला. मात्र, यावरून झालेल्या वादानंतर आरोपीने तिला लोकलमधून खाली ढकलल्याचा आरोप आहे. या घटनेत महिलेचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली सापडल्याने तो कोपराखालून कापावा लागला. डोक्यालाही गंभीर दुखापत होऊन १६ टाके पडले आहेत. याप्रकरणी भाईंदर रेल्वे पोलिसांनी ५३ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे.
गर्दीमुळे दिव्यांगांच्या डब्यात चढली महिला
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी (दि. ४) संध्याकाळी ही घटना घडली. नायगावमध्ये राहणारी २० वर्षीय विवाहित महिला बोरिवलीहून विरारच्या दिशेने लोकलने प्रवास करत होती. लोकलमध्ये गर्दी असल्याने ती चुकून दिव्यांग प्रवाशांसाठी राखीव असलेल्या डब्यात चढली होती. याच डब्यात जितेंद्र हिरमुखे (५३) हा व्यक्ती प्रवास करत होता. त्याने महिलेला वारंवार अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप आहे. महिलेने या गैरवर्तनाला विरोध करत त्याला जाब विचारला. त्यानंतर दोघांमध्ये वाद सुरू झाला.
नायगाव स्थानकात महिलेला ढकलल्याचा आरोप
लोकल नायगाव स्थानकात पोहोचल्यानंतरही दोघांमधील वाद सुरूच होता. महिलेच्या तक्रारीनुसार, आरोपीने तिच्याशी गैरवर्तन सुरूच ठेवलं. यावरून वाद वाढला आणि त्याने महिलेला ढकलल्याचा आरोप आहे. यावेळी महिला रेल्वेच्या दोन डब्यांमधील मोकळ्या जागेत पडली. ती उठण्याचा प्रयत्न करत असतानाच लोकल सुरू झाली. त्यामुळे तिचा डावा हात रेल्वेच्या चाकाखाली सापडला आणि ती गंभीर जखमी झाली.
जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर पुढील उपचारांसाठी तिला कूपर रुग्णालयात हलवण्यात आलं. हाताला गंभीर दुखापत झाल्याने डॉक्टरांना तिचा डावा हात कोपराखालून कापावा लागला. डोक्याला झालेल्या दुखापतीमुळे १६ टाकेही घालावे लागले.
'तुमच्या घरी आई-बहीण नाही का?' पीडित महिलेने सांगितला प्रसंग
एनडीटीव्हीशी रुग्णालयातून बोलताना पीडित महिलेने आपल्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. "मी बोरिवलीहून नायगावला जात होते. नायगाव स्थानक जवळ येत असताना एक व्यक्ती मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करत होती. मी त्याला जाब विचारला. लोकलमधून उतरल्यानंतरही तो माझ्याशी गैरवर्तन करत होता. मी त्याला 'तुमच्या घरी आई किंवा बहीण नाही का?' असं विचारलं. तरीही तो थांबला नाही," असं महिलेने सांगितलं.
त्यानंतर दोघांमध्ये शिवीगाळ झाली. महिलेने चप्पलने त्याला दूर करण्याचा प्रयत्न केला असता त्यानेही तिला चप्पलने मारलं आणि नंतर ढकलून दिलं, असा आरोप तिने केला.
'माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं, मला न्याय हवा'
या घटनेनंतर पीडित महिलेने आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. "मला न्याय हवा आहे. माझं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. घरातील सर्व जबाबदाऱ्या मी सांभाळत होते. आता एका हाताने मी काय करू? माझ्या डोक्याला १६ टाके पडले आहेत. मी लवकर बरी व्हावी, यासाठी प्रार्थना करा. आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे,” असं तिने सांगितलं.
CCTV फुटेजच्या आधारे आरोपीला अटक
घटनेनंतर आरोपीने आपला चेहरा रुमालाने झाकून पळ काढला होता. मात्र, रेल्वे पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणचं सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याची ओळख पटवली आणि त्याला अटक केली. भाईंदर रेल्वे पोलिसांनी आरोपीविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.