मुंबई

Mumbai : 'माझ्या भावावर तलवारीने वार…'; मालाडमध्ये दोन गटांत तुफान हाणामारी; एक तरुण गंभीर जखमी, पाच जण अटकेत

मुंबईतील मालाडमध्ये संतोष नगर बाजार परिसरात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली. पूजेदरम्यान सुरू झालेल्या वादाने हिंसक रूप धारण केल्याने एका तरुणावर तलवारीने हल्ला झाल्याचा आरोप असून तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणात पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Mayuri Gawade

मालाड पूर्व येथील संतोष नगर बाजार परिसरात रविवारी (दि. ५) रात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादाने परिसरात मोठी दहशत पसरली. किरकोळ वादातून सुरू झालेली झटापट काही क्षणांतच हाणामारीत बदलली. या घटनेत एक जण गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. यावेळी परिसरात पूजा सुरू असल्याने मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते, त्यामुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. ही घटना दिंडोशी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.

‘माझ्या भावावर मागून तलवारीने वार झाला’

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, “पूजा सुरू असल्याने परिसरात मोठी गर्दी होती. अचानक काही जणांनी आमच्या राज नावाच्या मित्रावर हल्ला केला. त्याला वाचवण्यासाठी माझा धाकटा भाऊ प्रशांत पुढे गेला, मात्र त्याच्यावर मागून तलवारीने वार करण्यात आला. त्याच्या डोक्याला आठ टाके पडले आहेत आणि डोळ्याजवळून रक्तस्राव होत आहे. डॉक्टरांनी त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले आहे.”

यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याचा आरोप करत काही गटांकडून सणांमध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला.

सोशल मीडियावर या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाले असून, रस्त्यावर मोठी गर्दी आणि पोलिसांचा बंदोबस्त दिसत आहे.

तणाव वाढताच पोलिसांचा हस्तक्षेप

या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी सौम्य बळाचा वापर करत जमाव पांगवला. उपायुक्त महेश चिमटे यांनी सांगितले की, “घटनेत सहभागी असलेल्या सर्वांवर कारवाई केली जात आहे. जखमींचा जबाब नोंदवून आरोपींची ओळख पटवली जाईल.”

महिलेचा गंभीर आरोप; निगराणीवर प्रश्नचिन्ह

घटनेची साक्षीदार असलेल्या एका महिलेनं परिसरातील परिस्थितीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. “इथे नेहमीच ५० ते १०० जणांच्या गटात येऊन तलवारी आणि दगडांसह हल्ले केले जातात. त्यांना कोणावर हल्ला करायचा याचीही पर्वा नसते. अनेक वर्षांपासून इथे ड्रग्सचा व्यवसाय सुरू आहे, पण पोलिसांकडून यावर ठोस कारवाई होत नाही,” असा आरोप तिने केला.

परिसरात पोलिसांकडून सीसीटीव्ही यंत्रणा नसल्याचा मुद्दाही तिने उपस्थित केला. “इथे पोलिसांचे कॅमेरेच नाहीत, मात्र काही गटांकडे स्वतःची देखरेख व्यवस्था आहे,” असेही ती म्हणाली.

लाठीचार्जचा आरोप; पोलिसांकडून दुजोरा नाही

दरम्यान, माजी नगरसेवक विनोद मिश्रा यांनी काही समाजकंटकांनी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केल्याचा आरोप केला. जखमींना रुग्णालयात नेत असतानाच पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा दावा त्यांनी केला. एका अल्पवयीन मुलालाही मारहाण होऊन त्याचा हात फ्रॅक्चर झाल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, या आरोपांना पोलिसांकडून अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.

सध्या परिसरातील परिस्थिती नियंत्रणात असून, पुढील तणाव टाळण्यासाठी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.

Mumbai : खड्डे भरण्यासाठी यंदा पुन्हा १०० कोटींच्या निविदा; रस्त्यांच्या काँक्रीटीकरणावर भर देणार

घाटकोपर जलाशय दुरुस्ती पूर्ण; १० एप्रिलपासून नियमित पाणीपुरवठा सुरू

सुनेत्रांविरुद्ध उमेदवार देण्याचा काँग्रेसला हक्क; संजय राऊत यांच्याकडून समर्थन; पार्थ पवारांवर टीका

वाढीव महागाई भत्त्यासाठी निवासी डॉक्टर आक्रमक; दोन दिवसांत परिपत्रक जारी करा; अन्यथा शुक्रवारपासून आंदोलन

यंदा पाऊसही रुसणार; 'स्कायमेट'चा अंदाज