मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचा; एकनाथ शिंदेंची घोषणा, भाजपमध्ये चलबिचल  संग्रहित फोटो
मुंबई

मुंबईचा पुढील महापौर शिवसेनेचा; एकनाथ शिंदेंची घोषणा, भाजपमध्ये चलबिचल 

मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून पुढील महापौर शिवसेनेचा असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर या विषयी आधीच चर्चा झाल्याचे सांगत शिंदे यांनी महापौर रितू तावडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील सव्वा वर्षे शिवसेनेचा महापौर असेल, असा दावा केला.

Swapnil S

मुंबई : मुंबईचा प्रथम नागरिक म्हणून पुढील महापौर शिवसेनेचा असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर या विषयी आधीच चर्चा झाल्याचे सांगत शिंदे यांनी महापौर रितू तावडे यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर पुढील सव्वा वर्षे शिवसेनेचा महापौर असेल, असा दावा केला. एकनाथ शिंदे यांच्या या वक्तव्यामुळे मुंबई महापालिकेतील मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेला भाजप काय भूमिका मांडणार याकडे सगळ्याच राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन निवासस्थानी अनौपचारिक बैठकीत पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील विविध प्रश्नांवर भाष्य केले.

मुंबई महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या पाठिंब्यामुळे भाजपला मुंबई महापालिकेतील सत्ता स्थापन करणे शक्य झाले. त्यानुसार अडीच वर्षांसाठी भाजपने महापौरपदाची माळ रितू तावडे यांच्या गळ्यात घातली. रितू तावडे या अडीच वर्षांसाठी महापौरपदी असणार आहेत. मात्र त्यानंतर पुढील सव्वा वर्षे महापौर शिवसेनेचा असेल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

रस्त्यांच्या कामांमुळे शहरातील खड्ड्यांची समस्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा दावा केला. मुंबईतील सुमारे १,८०० किलोमीटर रस्त्यांची कामे पूर्ण झाल्यामुळे खड्डे बुजविण्यासाठी पूर्वी दरवर्षी ४०० ते ४५० कोटी रुपये खर्च होत होते, तो आता अवघ्या २५ कोटी रुपयांपर्यंत खाली आल्याचे त्यांनी सांगितले. येत्या वर्षभरात मुंबई पूर्णपणे खड्डेमुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

शहरातील पुनर्विकास प्रकल्पांवर बोलताना त्यांनी जुन्या इमारती आणि झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास हा सरकारचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असल्याचे सांगितले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होणार असून गिरणी कामगारांनाही मुंबईबाहेर जावे लागणार नाही, असा दावा त्यांनी केला. तसेच सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर केवळ सांडपाण्याचा प्रश्न सुटणार नाही, तर पुनर्प्रक्रियेतून पिण्यायोग्य पाणीही उपलब्ध होईल, असे त्यांनी नमूद केले. तसेच समुद्रात जाणारे सांडपाणी रोखले जाईल आणि समुद्रातील प्रदूषण कमी होईल, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला. 

उद्यानांचे आरक्षण बदलू देणार नाही

वांद्रे रेक्लमेशन येथील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाच्या बदललेल्या आरक्षणाबाबत विचारले असता शिंदे यांनी उद्यानांच्या जागांबाबत कठोर भूमिका मांडली. "मुंबईतील एकाही उद्यानाचा भूखंड अन्य कारणांसाठी वापरू देणार नाही. आरक्षण बदलण्याचा निर्णय सभागृहात झाला असला, तरी अंतिम निर्णयापूर्वी नागरिकांच्या हरकती आणि सूचना मागविण्यात येत आहेत," असे त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबईची जबाबदारी चौघांवर 

मुंबई महापालिकेत पाय घट्ट करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी रणनीती आखली आहे. मुंबईत शिवसेनेचे वर्चस्व वाढीसाठी शिवसेना कार्यरत असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे , माजी खासदार राहुल शेवाळे, उपसभापती सचिन अहिर, राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर सोपविण्यात आल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. 

मुख्यमंत्र्यांशी आधीच चर्चा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात याबाबत आधीच ठरले आहे. त्यामुळे पुढील सव्वा वर्षे मुंबईचा महापौर शिवसेनेचाच असेल, असे एकनाथ शिंदे ठामपणे म्हणाले. महापौरपदाबाबतच्या शिंदेंच्या या स्पष्ट वक्तव्यामुळे महायुतीतील सत्ता समीकरणांवर नव्याने चर्चा सुरू झाली असून मुंबई महापालिकेतील पुढील राजकीय घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

नेपाळमध्ये ३०० भारतीय बेपत्ता; महापुरातील मृतांची संख्या ३५९; राज्यातील ११४ पर्यटक अडकले, ५३ पर्यटक सुरक्षित

Nepal Floods : अडकलेल्यांमध्ये मुंबईचे दोन नामांकित डॉक्टर

'मराठी'साठी एक वर्षाची मुदतवाढ; फडणवीसांची घोषणा; रिक्षा-टॅक्सीचालकांना दिलासा, मुख्यमंत्र्यांची शिवसेना शिंदे गटावर कुरघोडी?

Ganpati Special Train : गणेशोत्सवासाठी आणखी ४ विशेष गाड्या; उद्यापासून आरक्षण सुरू, पाहा संपूर्ण वेळापत्रक

मोहन भागवत यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी