

वॉशिंग्टन / न्यूयॉर्क : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्क दौऱ्यापूर्वी अमेरिकेतील धार्मिक स्वातंत्र्याशी संबंधित सल्लागार संस्थेने ट्रम्प प्रशासनाकडे त्यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी केली आहे. सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर असून ते अमेरिकेत दाखल झाले आहेत.
२९ ऑगस्ट रोजी न्यूयॉर्कमधील 'मॅडिसन स्क्वेअर गार्डन' येथील इन्फोसिस थिएटरमध्ये आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन्स' या कार्यक्रमाला भागवत संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम सर्वधर्मसमभाव आणि बहुसांस्कृतिक संवादासाठी आयोजित करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 'युनायटेड स्टेट्स कमिशन ऑन इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम'ने वक्तव्य प्रसिद्ध करून भागवत यांच्या अमेरिका दौऱ्याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
रा. स्व. संघाच्या उपसंघटना धार्मिक अल्पसंख्याकांवर होणाऱ्या हिंसक हल्ल्यांमध्ये सामील असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे. धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर लक्षित निर्बंध लादण्याचे आणि मोहन भागवत यांचा व्हिसा तातडीने रद्द करण्याचे आवाहन अमेरिकी सरकारला करण्यात आले आहे. भारताने यूएससीआयआरएफचे हे सर्व दावे फेटाळून लावले असून ही संस्था पक्षपाती आणि विश्वासार्हता नसलेली असल्याचे म्हटले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी स्पष्ट केले की, ही एक पक्षपाती संस्था आहे आणि तिचा स्वतःचा छुपा अजेंडा आहे. या संस्थेकडे कोणतीही विश्वासार्हता उरलेली नाही.
संघर्ष करू नका
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यूयॉर्कमधील आगामी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, एका हिंदू-अमेरिकन हक्क संघटनेने उपस्थित राहणाऱ्या नागरिकांसाठी 'कम्युनिटी अलर्ट' जारी केला आहे. या कार्यक्रमाला विरोध करणाऱ्या आंदोलकांशी कोणताही वाद किंवा संघर्ष न करता सतर्क राहण्याचे आवाहन यामध्ये करण्यात आले आहे.
कार्यक्रमस्थळीच आंदोलन
'हिंदू अमेरिकन फाउंडेशन' या अमेरिकेतील बिगर-नफा तत्त्वावर काम करणाऱ्या संस्थेने, हा कार्यक्रम रद्द पाडण्याचा आणि त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो, असा इशारा दिला आहे. 'हिंदूज् फॉर ह्युमन राइट्स' आणि इतर समविचारी संघटनांनी या कार्यक्रमाच्या दिवशीच मॅडिसन स्क्वेअर गार्डनबाहेर मोठ्या आंदोलनाचे आयोजन केले आहे. "मोहन भागवत हे सर्व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत नाहीत. ते एका उग्रवादी हिंदू विचारसरणीचे नेतृत्व करतात," असा आरोप 'हिंदूज् फॉर ह्युमन राइट्स'च्या उप-कार्यकारी संचालक श्राव्या तडेपल्ली यांनी केला आहे. या पार्श्वभूमीवर, हिंदू अमेरिकन फाउंडेशनने न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांना आपल्या कर्तव्याची आठवण करून दिली आहे. मॅडिसन स्क्वेअर गार्डन येथील कार्यक्रमाला उपस्थित राहणाऱ्यांसह सर्व न्यू यॉर्कवासीयांच्या सुरक्षेची आणि नागरी हक्कांची हमी त्यांनी द्यावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.