मुंबई

‘ती’ आली...तिने पाहिले...तिने जिंकले! ‘मेट्रो-३’च्या अंतिम टप्प्याला प्रवाशांचा जोरदार प्रतिसाद

आरे ते वरळीपर्यंत धावणाऱ्या ‘मेट्रो-३’ने सीमोल्लंघन करून गुरुवारी कफ परेडपर्यंत धाव घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, नरिमन पाइंट, कफ परेड या उद्योग, व्यवसायांची कार्यालये असलेल्या भागात नवचैतन्यच पसरले.

Swapnil S

संतोष तळाशिलकर/मुंबई

आरे ते वरळीपर्यंत धावणाऱ्या ‘मेट्रो-३’ने सीमोल्लंघन करून गुरुवारी कफ परेडपर्यंत धाव घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, चर्चगेट, नरिमन पाइंट, कफ परेड या उद्योग, व्यवसायांची कार्यालये असलेल्या भागात नवचैतन्यच पसरले. अंगातून चिकचिकणारा घाम, बेस्ट बसचा लेटलतिफ कारभार, टॅक्सीवाल्यांची मग्रुरी आदींनी कंटाळलेल्या दक्षिण मुंबईकरांना आता ‘मेट्रो-३’च्या चकचकीत-गारेगार प्रवासाने मोहून टाकले. आपला प्रवास इतका छान होऊ शकतो, या जाणिवेनेच अनेकजण भारावले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून ‘मेट्रो-३’ आरे ते कफ परेडपर्यंत धावू लागली. या प्रवासाने उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबई जोडली गेली आहे. उत्तर मुंबई आणि मध्य मुंबईतून मंत्रालय, कफ परेडला जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे किंवा बसमधील गर्दी पाहून अंगावर काटा येतो. घामाने डबडबलेले शरीर, रेल्वे व बसमधील धक्काबुक्की, सीटसाठी होणाऱ्या हाणामाऱ्या, भांडणे आदींमुळे कामावर जाणारा प्रवासी प्रवासातच थकतो. पण, ‘मेट्रो-३’मुळे हाच प्रवास अत्यंत सहज व सोपा झाला आहे. त्यामुळे सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रवाशांची या मार्गावर गर्दी दिसत होती.

सीएसएमटी स्टेशनमधून भुयारात गेल्यानंतर तेथेच ‘मेट्रो’चे प्रवेशद्वार आहे. त्यामुळे दोन्ही स्टेशन जोडली गेल्याने प्रवाशांना बाहेर पडण्याचा त्रास सहन करावा लागत नाही. त्यामुळे प्रवाशांचा वेळ मोठ्या प्रमाणावर वाचू लागला आहे.

‘मेट्रो-३’ सुरू झाल्यानंतर त्याचे आकर्षण मोठ्या माणसांसोबत लहान मुलांनाही होते. त्यामुळे अनेक मुलांनी पहिल्याच दिवशी या प्रवासाचा आनंद लुटला. ते गडबडगोंधळ करत या प्रवासाची मजा लुटत होते. त्यामुळे काही ठिकाणी ज्येष्ठ प्रवाशांनी त्यांना योग्य ती समज दिली.

आपल्या दैनंदिन कामासाठी लाखो लोक मंत्रालय, नरिमन पाइंट भागात प्रवास करतात. सीएसएमटीवरून बेस्टच्या ११५ किंवा १११ मधून मंत्रालय किंवा चर्चगेटहून सुटणाऱ्या १०० क्रमांकाच्या बसेस गर्दीने तुडुंब वाहत असतात. विशेष म्हणजे एक बस गेल्यानंतर दुसरी बस १५ ते ३० मिनिटांनी उगवते. बसची वाट पाहण्यातच प्रवाशांचा वेळ फुकट जातो. तसेच ऑफिसमध्ये जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कायमच ‘लेट’मार्कचा सामना करावा लागतो. तो ‘मेट्रो-३’मुळे टळणार आहे.

सीएसएमटी ते मंत्रालय-नरिमन पॉइंट हा दाट रहदारीचा परिसर आहे. त्यामुळे या भागात कायम गर्दी असते. नरिमन पॉइंटहून सीएसएमटी किंवा चर्चगेटला जाण्यासाठी टॅक्सीवाले तयार नसतात. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. आता ‘मेट्रो’मुळे या परिसरातील दळणवळणाची मोठी सोय झाली आहे.

‘मेट्रो-३’वर प्रवासी खूश

आता ‘मेट्रो-३’ने सीएसएमटी ते मंत्रालय हे अंतर ५ मिनिटांवर आणले आहे. मेट्रोत बसतो कधी व स्टेशन येते कधी हेच कळत नाही. इतका हा प्रवास सहज झाला आहे. बेस्टच्या प्रवासाने कंटाळलेले प्रवासी जेव्हा ‘मेट्रो-३’मध्ये बसले तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. ‘मेट्रो’ स्थानकात प्रवेश केल्यानंतर थंडगार हवा, स्वच्छता, तेथील टापटिपपणामुळे माणूस खुश होतो. तिकीट काढण्यासाठी तिकीट खिडकी व तिकीट वेंडिंग मशिन्स ठेवली आहेत. त्यामुळे पटापट तिकीट निघते.

मोबाईल नेटवर्कची समस्या

‘मेट्रो-३’ ही भुयारी असल्याने त्याच्यात नेटवर्कची मोठी समस्या आहे. रेल्वे स्टेशन किंवा गाडीत नेटवर्क मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांची अडचण होते. कारण पूर्ण प्रवासात नेटवर्क नसल्याने इतरांशी संपर्क तुटतो. ही समस्या ‘एमएमआरसी’ने लवकरात लवकर सोडवणे गरजेचे आहे. रेल्वे स्थानकात ‘एमएमआरसी’कडून तिकीट काढण्यासाठी ‘वायफाय’ची सुविधा पुरवली जाते. तसेच तिकीट काढण्यासाठी सहाय्यकांची नियुक्ती केली आहे.

टॅक्सीचालकांच्या व्यवसायावर परिणाम

मेट्रो सुरू झाल्यानंतर प्रवाशांनी त्याचा वापर सुरू केला. त्यामुळे या भागात टॅक्सी व्यवसाय करणाऱ्या टॅक्सीचालकांच्या धंद्यावर परिणाम झालेला दिसत आहे. नरिमन पॉइंट ते चर्चगेट शेअर टॅक्सीऐवजी लोक आता मेट्रोला प्राधान्य देताना दिसत होते.

पहिल्याच दिवशी १ लाख १८ हजार प्रवाशांनी केला प्रवास

‘मेट्रो-३’च्या आचार्य अत्रे चौक ते कफ परेड या अंतिम टप्प्याचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. त्यानंतर गुरुवारी पहिल्याच दिवशी सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ लाख १८ हजार प्रवाशांनी या मेट्रोच्या प्रवासाचा आनंद लुटला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत ९७ हजार ८४६ प्रवाशांनी ‘मेट्रो-३’मधून प्रवास केला, तर सायंकाळी ७ वाजेपर्यंत १ लाख १८ हजार २८६ प्रवाशांनी प्रवास केला.

...म्हणून प्रवास कंटाळवाणा होण्याची शक्यता

आरे ते कफ परेड हा ३३ किमीचा मार्ग पूर्णपणे भुयारी आहे. त्यामुळे या प्रवासात बाहेरचे काहीच दिसत नाही. या बंदिस्त प्रवासामुळे काही जणांना त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रवास कंटाळवाणा होऊ नये म्हणून संगीत सुरावटी लावल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकतो.

AQI १०५ वर पोहोचला! मुंबईत हवेची गुणवत्ता घसरली; हिवाळ्यात प्रदूषणाचा उच्चांक गाठण्याची शक्यता

उमेश कोल्हे हत्याकांड : विशेष NIA न्यायालयाने शकील शेखचा फेटाळला जामीन

Mumbai Metro 3 : पहिल्याच दिवशी चर्चगेट स्थानकावर प्रवाशांची मोठी गैरसोय, व्हिडिओ व्हायरल

२०२२ पूर्वी भ्रूण गोठवले असल्यास सरोगसी कायद्यातून सूट; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

ई-बस प्रवाशांसाठी खुशखबर; एसटीकडून मासिक व त्रैमासिक पास योजना