मुंबई : भूमिगत कुलाबा-वांद्रे-सीप्झ या ‘मेट्रो-३’ मार्गाचा आरे ते बीकेसी हा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रवाशांच्या सेवेत येणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रवासासाठी १० ते ५० रुपये तिकीट असणार आहे, तर आरे ते कफ परेडपर्यंतच्या प्रवासासाठी ७० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा दुसरा टप्पा मार्च २०२५ पर्यंत सुरू होईल, असे ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’च्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.
‘मेट्रो-३’ प्रकल्पातील आरे ते बीकेसी या पहिल्या टप्प्याची सेवा सुरू करण्यासाठी ‘मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन’ प्रयत्नशील आहे. पहिल्या टप्प्यातील मेट्रोची सुरक्षा चाचणी सुरू आहे. या चाचण्या लवकरच पूर्ण होणार आहेत. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील मेट्रो सेवेचे लोकार्पण ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात १० स्थानके आहेत. या टप्प्यात ९ ट्रेनमार्फत दररोज ९६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. सकाळी ६.३० ते रात्री १०.३० पर्यंत मेट्रो सुरू राहणार आहे, तर सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० पासून मेट्रो सुरू होणार आहे. मेट्रोचे १० रुपयांपासून तिकीट सुरू होणार असून आरे ते बीकेसी प्रवासासाठी ५० रुपये भाडे आकारण्यात येणार आहे, तर पहिल्या टप्प्यातील मेट्रो साडेसहा मिनिटांच्या अंतराने धावणार आहे.
प्रवासासाठी क्यूआर कोड पेपर तिकीट आणि मोबाईल ॲप आधारित तिकीट प्रवासासाठी चालणार आहे. मेट्रोचे दोन्ही टप्पे प्रवाशांच्या सेवेत दाखल झाल्यानंतर दररोज १३ लाख प्रवासी मेट्रोतून प्रवास करतील, असा अंदाज आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी प्रकल्प आराखडा तयार करतेवेळी २३ हजार ९०० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र तांत्रिक कारणे, कारशेड वाद, कोरोना आदीमुळे खर्चात वाढ झाली असून हा खर्च ३७ हजार २७६ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. यापुढे प्रकल्पखर्चात कोणतीही वाढ अपेक्षित नसल्याचे भिडे यांनी सांगितले.
मेट्रो बंद झाल्यास 'टनेल'मधून चालत दुसरे स्थानक गाठता येणार
मुंबईतील पहिली ‘मेट्रो-३’ सेवा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. काही तांत्रिक कारणामुळे मेट्रो बंद झाल्यास प्रवासी मेट्रोमध्ये अडकून पडणार नाहीत. प्रवाशांना मोटरमन आणि मागील बाजूने गाडीतून उतरून टनेलमधून स्टेशन गाठता येणार आहे. मेट्रोच्या ट्रॅकमधून वॉक-वे तयार करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना चालत स्टेशन गाठता येणार आहे.
बुलेट ट्रेनला ‘मेट्रो-३’ जोडणार
‘मेट्रो-३’चे बीकेसीमधील स्थानक बीकेसीमधील बुलेट ट्रेनच्या स्थानकापासून दीड किलोमीटर दूर आहे. बीकेसीतील काही कार्यालयांनी बुलेट ट्रेन भूमिगत मेट्रोला थेट जोडण्याचे प्रस्ताव दिले आहेत. त्यानुसार ‘मेट्रो-३’ आणि बुलेट ट्रेन पादचारी मार्गाने जोडण्याचा प्रस्ताव ‘नॅशनल हायस्पीड रेल कोर्पोरेशन’ला ‘एमएमआरसी’ने दिला आहे.
पहिल्या टप्प्यात ९ ट्रेनमार्फत दररोज ९६ फेऱ्या.
सकाळी ६.३० ते रात्री १०.३० पर्यंत मेट्रो सुरू राहणार.
सुट्टीच्या दिवशी सकाळी ८.३० पासून मेट्रो सुरू होणार.
मेट्रोचे तिकीट १० रुपयापासून सुरू होणार.
आरे ते बीकेसी प्रवासासाठी ५० रुपये भाडे.
आरे ते कफ परेड प्रवासासाठी ७० रुपये भाडे.
आरे ते कफ परेड अंतर एका तासात पूर्ण होणार.