Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक  (Photo-X/@MMMOCL_Official)
मुंबई

Mumbai : अखेर प्रतीक्षा संपली! मेट्रो लाईन २बी आणि ९चा शुभारंभ; दहिसर-काशीगाव मार्गावर सेवा सुरु, जाणून घ्या वेळापत्रक

मुंबईत मेट्रो लाईन २बी आणि ९ सुरू होत असून, उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई महानगर प्रदेशातील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. मंगळवार (दि. ७) मेट्रो लाईन २बी आणि लाईन ९ या दोन नव्या मार्गांचा शुभारंभ करण्यात आला असून, यामुळे उपनगरांतील प्रवास अधिक जलद आणि सोयीस्कर होणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत दहिसर आणि चेंबूर येथे स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये या मार्गांचे उद्घाटन करण्यात आले. बुधवार (दि. ८) पासून या मार्गांवर सर्वसामान्यांसाठी सेवा सुरु होणार आहे.

लाईन ९मुळे मीरा-भाईंदरला मेट्रोचा दुवा

लाईन ९ दहिसर पूर्व ते काशीगाव (मीरा-भाईंदर) दरम्यान धावणार असून, यामुळे ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदरपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला आहे. उत्तर उपनगरांतील प्रवाशांसाठी हा जलद प्रवासाचा महत्त्वाचा पर्याय ठरणार आहे.

लाईन २बीमुळे चेंबूरला मोठा फायदा

दुसरीकडे, लाईन २बीमुळे चेंबूर आणि हार्बर लाईन परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या मार्गाचा पहिला टप्पा मंडाले ते डायमंड गार्डनदरम्यान सुरू करण्यात आला असून, पुढील टप्पा एकामागोमाग एक असे सुरु केले जाणार आहेत.

लाईन ७-९ संयुक्त सेवा, थेट प्रवास शक्य

प्रवाशांच्या सोयीसाठी लाईन ७ आणि लाईन ९ एकत्रितपणे चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे अंधेरी पूर्व येथील गुंडवलीपासून काशीगावमार्गे मीरा-भाईंदरपर्यंत थेट प्रवास करणे शक्य होणार आहे. मात्र, लाईन २ए स्वतंत्रपणेच सुरू राहणार आहे.

मेट्रोची वेळ आणि फेऱ्या

एमएमआरडीएकडून लाईन २ए आणि ७ साठी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. लाईन २ए सकाळी ५:५० ते रात्री ११ वाजेपर्यंत धावणार असून, गर्दीच्या वेळी सुमारे ६ मिनिटांच्या अंतराने गाड्या उपलब्ध असतील. आठवड्याच्या दिवसांत सुमारे २८९ फेऱ्या होणार आहेत.

लाईन ७-९ या सुमारे २० किलोमीटरच्या संयुक्त मार्गावरही हीच सेवा दिली जाणार आहे. लाईन २बीच्या पहिल्या टप्प्यात (मंडाले-डायमंड गार्डन) सकाळी ६ ते रात्री १०:३० पर्यंत सेवा उपलब्ध असेल. दररोज २०० हून अधिक फेऱ्या सुमारे ९.५ मिनिटांच्या अंतराने चालवण्यात येणार आहेत.

दहिसर इंटरचेंज ठरणार महत्त्वाचा दुवा

दहिसर स्थानकावर लाईन २ए आणि लाईन ७ यांच्यातील इंटरचेंज हा या प्रकल्पाचा महत्त्वाचा भाग ठरणार आहे. प्रवाशांना स्टेशनच्या बाहेर न जाता लाईन बदलता येणार असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

पहिल्या टप्प्यातील ४ स्थानके

सुमारे ४.९७ किलोमीटर लांबीच्या या पहिल्या टप्प्यात एकूण ४ स्थानके असणार आहेत. यामध्ये दहिसर पूर्व, पांडुरंग वाडी, मिरागाव आणि काशीगाव या स्थानकांचा समावेश आहे.

मेट्रो जाळ्याचा विस्तार वेगात

सध्या मुंबईत लाईन १सह काही मार्गांवर मेट्रो सेवा सुरू असून, लाईन ३ टप्प्याटप्प्याने सुरु होत आहे. आगामी काळात मेट्रो नेटवर्कचा विस्तार आणखी वेगाने होणार असल्याचे संकेत आहेत.

Mumbai : बुलेट ट्रेनचे काम वेगाने सुरू; दुसऱ्या टीबीएमचे कटरहेड सावली शाफ्टमध्ये दाखल

Mumbai : मानसिक आरोग्याच्या मनमोकळ्या संवादाला चालना; पालिकेच्या सहकार्याने 'रिस्टार्ट' चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

पाकिस्तानातील क्वेट्टा येथे भीषण स्फोट; रेल्वे ट्रॅकजवळील हल्ल्यात २४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी

संख्याबळ शिवसेनेकडे, पण तटकरेंची रणनीतीही मजबूत; तटकरे-गोगावले पुन्हा आमनेसामने?

Bhayandar : पोलिसांकडूनच वृक्षतोड; उत्तनमधील प्रकार, पर्यावरणप्रेमींनी केली तक्रार