मुंबई : मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी, यासाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन्स कॉर्पोरेशन लिमिटेडतर्फे (एमएमएमओसीएल) मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांसाठी व्यापक पावसाळी उपाययोजना आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मेट्रो २ए आणि ७ या मार्गिकांवरील १० महत्त्वाच्या स्थानकांवर वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ‘विंड व्हेलॉसिटी अॅनिमोमीटर’ यंत्रे बसविण्यात आले आहे.
पावसाच्या पार्श्वभूमीवर मेट्रो सेवा सुरळीत सुरू राहावी यासाठी महामुंबई मेट्रोने विविध उपाययोजना केल्या आहेत त्यानुसार पाणी साचण्याची शक्यता असलेल्या भागांमध्ये प्रवाशांचा प्रवास सुरळीत होण्यासाठी मेट्रो सेवेच्या फेऱ्या वाढविण्यात आल्या आहेत. तर प्रत्येक मेट्रो स्थानकात किमान ६४ हाय-डेफिनिशन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून सुरक्षा आणि देखरेख यासाठी २४बाय ७ नियंत्रण ठेवण्यात येत आहे.
आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ प्रतिसाद देता यावा म्हणून मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथकासाठी स्वतंत्र इमर्जन्सी कोच सज्ज ठेवण्यात आला आहे. तसेच डीजी सेट्स, यूपीएस यंत्रणा, लाइटनिंग अरेस्टर्स, अर्थिंग सिस्टीम्स आणि डीवॉटरिंग पंप यांची काटेकोर तपासणी आणि चाचणी करून ३० स्थानके आणि चारकोप डेपो येथे ही साधनसामग्री सज्ज ठेवण्यात आली आहे.
सर्व ३४ मेट्रो गाड्यांची सखोल वॉटरप्रूफ चाचणी करण्यात आली असून मुसळधार पावसातही गळती होणार नाही, याची खातरजमा करण्यात आली आहे आणि प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायक असेल, हे सुनिश्चित केले आहे. संपूर्ण ३५ किमी लांबीच्या व्हायाडक्टची स्वच्छता पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये रूफ गटर्स, पावसाचे पाणी वाहून नेणारे पाइप, सॉसर ड्रेन्स, मेडियन चेंबर्स आणि ३० स्थानकांवरील ड्रेनेज लाइन यांचा समावेश आहे.
सेवा सुरळीत सुरू राहण्यासाठी उपाययोजना
प्रत्येक प्रकल्पासाठी स्वतंत्र नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. स्थानिक पातळीवर उपाययोजना वेळेत आणि प्रभावीपणे पार पडतील याची खातरजमा हे अधिकारी करतील. खड्डे भरण्यासाठीची वाहने आणि पाणी उपसण्यासाठीचे पंप महत्त्वाच्या ठिकाणी अगोदरच तैनात करण्यात आले आहेत. तसेच, पावसाळ्यात पादचारी व वाहनांच्या वाहतुकीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेट्रो स्थानकांभोवती ट्रॅफिक वॉर्डन नेमण्यात आले असून सुरक्षितता आणि सुरळीत सेवेची खात्री करण्यात आली आहे.