मुंबई : काही दिवसांच्या विश्रांतीनंतर सक्रिय झालेल्या मान्सूनने मुंबई, कोकणसह राज्याच्या अनेक भागांना रविवारी चांगलेच झोडपून काढले. हवामान खात्याने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत रविवारी सकाळनंतर पुन्हा पावसाने जोर पकडल्याने काही भागांत पाणी साचले. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली. मात्र नंतर पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांना दिलासा मिळाला.
पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोकण आणि गोवा येथे अचानक पूर येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गेल्या तीन दिवसांत वैभववाडी तालुक्यात ३९३ मिमी, तर कुडाळमध्ये ३६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.