मुंबई : यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची गैरसोय होऊ नये, यासाठी पावसाचेही पाणी साचणाऱ्या ठिकाणी मोबाईल पंप बसवण्यात येणार आहेत. ७ झोनमध्ये प्रत्येकी एक पंप बसवण्यात येणार असून २५० क्युबिक मीटर ताशी पाणी उपसा करण्याची क्षमता मोबाईल पंपात असल्याचे पालिकेच्या पर्जन्य जलवाहिनी विभागाकडून सांगण्यात आले.
मुंबईत पाणी साचू नये, यासाठी प्लडिंग पाईटवर विशेष लक्ष केंद्रीत केले जाते. मात्र यंदा १३० नवीन फ्लडिंग पाईटची निर्मिती झाली असून मुंबईत ५६१ फ्लडिंग पाईट आहेत. पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये यासाठी ५४७ पंप बसवण्यात येणार आहेत. तरी काही ठिकाणी पंप बंद पडले अथवा तांत्रिक अडचण निर्माण झाली तर त्या ठिकाणी मोबाईल पंप उपलब्ध करण्यात येणार आहेत. पालिकेच्या ७ झोनमध्ये प्रत्येकी एक मोबाईल पंप तैनात असणार आहे.
युद्धपातळीवर सुरुवात
मुंबईची तुंबई होऊ नये यासाठी युद्धपातळीवर नालेसफाईच्या कामाला सुरुवात केली आहे. मिठीतील गाळ उपसण्यासाठी दोन कंत्राटदारांना काम देण्यात आले आहे. मिठीच्या तीनही पॅकेज अंतर्गत आणि मोठ्या, छोट्या नाल्यांतून गाळ काढण्याच्या कामांचा वेग वाढवण्यात यावा. पाणी साचण्याच्या ठिकाणांबाबत कार्यवाही करावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले.
एक हजार क्युबिक मीटर ताशी पाणी उपसा
पावसाळ्यात मुंबईत पाणी साचू नये, यासाठी मुंबई महापालिकेच्या हद्दीत आणि रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत एकूण ५४७ पंप बसवण्यात येणार आहेत. ताशी ६० क्युबिक मीटर ते एक हजार क्युबिक मीटर क्षमतेने पाणी उपसा करणारे पंप बसवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
सर्व माहिती डॅशबोर्डवर उपलब्ध
नालानिहाय कामे कधी सुरू होणार, कधी संपणार याचे काटेकोर नियोजन करण्यात यावे. नालानिहाय कामाची माहिती महापालिकेच्या डॅशबोर्डवर उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून आपल्या परिसरातील नालेसफाईचे काम कधी सुरू होणार आहे व कधी संपणार आहे, याची माहिती नागरिकांना मिळणे शक्य होईल. दर दिवसाला केल्या जाणाऱ्या कामाचे उद्दिष्ट निश्चित करून त्याची काटेकोर अंमलबजावणी होईल, असे निर्देश पालिका प्रशासनाने दिले आहेत.