मुंबई महापालिका संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : मुख्यालयासमोरच नवे ३५० आसनी सभागृह; चार मजली इमारतीत पार्किंगसह आधुनिक सुविधा

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जिमखान्याच्या जागेवर आधुनिक सोयीसुविधासह सभागृह साकारण्यात येणार आहे.

Swapnil S

मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबई महापालिका मुख्यालयासमोर जिमखान्याच्या जागेवर आधुनिक सोयीसुविधासह सभागृह साकारण्यात येणार आहे. चार मजली इमारतीत पार्किंग, ३५० आसन व्यवस्था असा आराखडा तयार केला असून लवकरच स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे नवीन सभागृहाला ऐतिहासिक लूक देण्यात येणार आहे.

मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक ब्रिटिशकालीन सभागृहात गेली अनेक दशके शहराच्या विकासापासून ते नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय झाले. मात्र, वाढती लोकप्रतिनिधी संख्या, अपुरी जागा आणि आधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन आता या सभागृहाला पर्याय म्हणून पालिका मुख्यालयासमोरील जिमखाना परिसरात ३५० आसन क्षमतेचे अत्याधुनिक सभागृह उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकल्पाचे भूमिपूजन ऑगस्टच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात करण्याचे नियोजन असून त्यासाठीचा अंतिम आराखडा महापालिकेने तयार केला आहे.

सध्याचे महापालिका सभागृह हे हेरिटेज वास्तूचा भाग असून त्यात २२७ नगरसेवक आणि दहा स्वीकृत नगरसेवकांसाठी आसनव्यवस्था आहे. अधिकारी, कर्मचारी आणि पत्रकारांसाठीची जागा मात्र अत्यंत मर्यादित असल्याने गेल्या अनेक वर्षांपासून नवीन सभागृहाची मागणी होत होती. त्यानुसार महापालिका मुख्यालयासमोरील आझाद मैदानालगतच्या जिमखाना जागेवर नवीन सभागृह उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सुधारित आराखड्याला मंजुरी

या आधी याच ठिकाणी टाऊन हॉल व जिमखाना उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, तो स्थायी समितीने फेटाळल्यानंतर सुधारित आराखड्यात त्याच जागेवर आधुनिक महापालिका सभागृह उभारण्याचे निश्चित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे नवीन इमारतीला आधुनिक सुविधा असल्या तरी तिची वास्तुरचना सध्याच्या महापालिका मुख्यालयाशी सुसंगत आणि हेरिटेज स्वरूपाची ठेवण्यात येणार आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी विशेष बैठक व्यवस्था

चार मजली इमारतीत तळमजल्यावर क्रीडा संकुल आणि वाहनतळाची व्यवस्था असेल. त्यावरील मजल्यावर नगरसेवक, महापालिका आयुक्त, सभागृह नेते आणि विरोधी पक्षनेत्यांची दालने असतील. सर्वात वरच्या मजल्यावर ३५० आसन क्षमतेचे प्रशस्त सभागृह उभारण्यात येणार असून त्यामध्ये नगरसेवक, अधिकारी आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र आसनव्यवस्था असेल.

दोन महिन्यांत भूमिपूजन

सभागृहात महापौर, सत्ताधारी पक्ष, विरोधी पक्ष आणि सर्वसामान्यांसाठी स्वतंत्र अशा चार लिफ्टची व्यवस्था असेल. याशिवाय सत्ताधारी आणि विरोधकांसाठी स्वतंत्र जिनेही असतील. नवीन सभागृह सुरू झाल्यानंतर सध्याचे ऐतिहासिक सभागृह जतन करून त्याचा वापर महापौरांच्या बैठका आणि अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांसाठी करण्याचे नियोजन महापालिकेने केले आहे. दरम्यान, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या अथवा दुसऱ्या आठवड्यात भूमिपूजन होईल.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

TDR वापरला म्हणून जमिनीचे हस्तांतरण नाकारता येणार नाही; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

वडोदरा-मुंबई टप्पा ३१ ऑगस्टपर्यंत खुला

'ऑथेंटिकेशन बायपास'बाबत सतर्क राहा! केंद्र सरकारचे नागरिकांना आवाहन

Mumbai : मयंक लोहार हत्याकांडानंतर माहीममध्ये आणखी एका तरुणावर चाकूहल्ला; आरोपी फरार

मुंबई, ठाणे, पालघरला पुढील चार दिवस 'यलो अलर्ट'; २ जुलै रोजी मुसळधार पावसाचा इशारा; सातही धरणांतील पाणीसाठा खालावल्याने चिंता वाढली