मुंबई : परळ रेल्वे स्थानकातील प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागणार आहे. कुर्ला ते परळ दरम्यान प्रस्तावित पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांसाठी परळ आणि प्रभादेवी स्थानकांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचा पूर्वेकडील जिना तोडण्याचे काम मध्य रेल्वेने सुरू केले आहे. प्रवाशांची गर्दी कमी करण्यासाठी २०२३ मध्ये बांधण्यात आलेल्या या पुलात तीन वर्षांत बदल करावा लागत आहे.
सहा मीटर रुंदीचा हा पादचारी पूल परळ आणि प्रभादेवी स्थानकांवरून दररोज प्रवास करणाऱ्या सुमारे तीन ते चार लाख प्रवाशांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. परळ स्थानकातील पूर्वेकडील जिना प्रस्तावित रेल्वे मार्गिकांच्या संरेखनात येत असल्याने तो हटविणे आवश्यक आहे. मध्य रेल्वेने पादचारी पुलाचा पूर्वेकडे विस्तार करण्याचे नियोजन केले आहे. विस्तारित पुलाखालून दोन अतिरिक्त रेल्वे मार्गिका जाणार आहेत.
पादचारी पुलाच्या पूर्वेकडील भागाचा विस्तार करण्यात येणार असून, नव्या रेल्वे मार्गिका त्याखालून जाणार आहेत. हे काम ऑक्टोबर २०२७ पर्यंत सुरू राहण्याची अपेक्षा आहे,” असे मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. या पाडकामामुळे प्रवाशांना त्रास होण्याची शक्यता आहे.
२००८ पासून रखडलेला प्रकल्प
कुर्ला-परळ-सीएसएमटी पाचवी आणि सहावी रेल्वे मार्गिका प्रकल्पाची घोषणा २००८ मध्ये करण्यात आली होती. मात्र, जमीन संपादन आणि प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन यामुळे हा प्रकल्प अनेक वर्षे रखडला. यंदा ७१४ प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाल्याने प्रकल्पातील महत्त्वाचा अडथळा दूर झाला आहे.
स्थानकातील सुविधांचे स्थलांतर
पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गिकांसाठी परळ स्थानकातील काही विद्यमान सुविधांचेही स्थलांतर करावे लागणार आहे. सध्याच्या पाचव्या रेल्वे मार्गिकेजवळील एका सामायिक इमारतीत तिकीट खिडक्या, स्टेशन मास्टर कार्यालय, रेल्वे कर्मचाऱ्यांची कार्यालये आणि दुचाकी पार्किंगची सुविधा आहे. नव्या मार्गिकांसाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी या सुविधा अन्यत्र हलवाव्या लागणार आहेत. उपलब्ध जागेचा जास्तीत जास्त वापर करून स्थलांतर कमीत कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले. परळ स्थानकाचे अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सुमारे १९ कोटी रुपये खर्चून नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर काही वर्षांतच नव्याने विकसित पायाभूत सुविधांमध्ये बदल करण्याची गरज निर्माण झाली आहे.