देवश्री भुजबळ/मुंबई
वांद्रे-कुर्ला संकुल येथील पॉड टॅक्सी प्रकल्पासाठी ४९९ झाडे कापण्याच्या प्रस्तावाविरोधात पर्यावरणप्रेमींनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. शहरात उष्णतेच्या लाटेचे सावट असताना, केवळ चार प्रवासी क्षमता असलेल्या एका 'फॅन्सी' टॅक्सीसाठी शहराचे हरित आच्छादन कमी करणे अतार्किक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही झाडे पॉड टॅक्सी प्रकल्पाच्या कुर्ला ते वांद्रे या मार्गावर आहेत. यामध्ये लहान-मोठ्या आणि रस्त्या कडेला असलेल्या झाडांचा समावेश आहे. "या प्रस्तावात सुधारणा केली जाईल. अंतिम मंजुरीसाठी तो अद्याप वृक्ष प्राधिकरणासमोर ठेवण्यात आलेला नाही," अशी माहिती उद्यान विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
महानगरपालिकेत नव्याने स्थापन झालेल्या वृक्ष प्राधिकरणाची पहिली बैठक गेल्या आठवड्यात पार पडली. महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्या अध्यक्षतेखालील हे प्राधिकरण पुढच्या बैठकीपासून विविध प्रस्तावांवर चर्चा करून अंतिम निर्णय घेणार आहे.
पर्यावरण कार्यकर्त्या नताशा परेरा म्हणाल्या, "बीकेसीमध्ये इलेक्ट्रिक बसेस, अंडरग्राउंड मेट्रो इत्यादी सुविधा उपलब्ध असताना या पॉड टॅक्सीवर वायफळ खर्च करण्याची काय गरज आहे? हा प्रकल्प एमएमआरडीए, सेबी, एनएसई, जीएसटी भवन यांसारख्या सरकारी कार्यालयांना जोडणारा असल्याने, करदात्यांच्या पैशातून याचा फायदा केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच होईल. मेट्रो आणि बुलेट ट्रेन प्रकल्पांमुळे बीकेसीमधील अनेक झाडे आधीच तोडली गेली आहेत. जगातील १०० उष्ण शहरांच्या यादीत भारतीय शहरांचा समावेश होत असताना, उरलेली झाडे का कापली जात आहेत?"
परेरा यांनी पुढे असेही नमूद केले की, झाडांचे पुनरोपण करणे म्हणजे त्यांना मारण्यासारखेच आहे, कारण पुनरोपण केलेली झाडे फार काळ टिकत नाहीत आणि त्यांना रोग लागण्याची शक्यता असते. "ज्या प्रकल्पामुळे झाडे किंवा खारफुटीचा नाश होतो आणि परिणामी शहराचे तापमान वाढते, तो प्रकल्प शाश्वत असू शकत नाही," असे त्यांनी स्पष्ट केले.
हरित आच्छादनाचे महत्व ओळखा
पर्यावरणवादी कार्यकर्ते निमिष माल्डे म्हणाले, "एमएमआरडीए प्रकल्पाचा मार्ग बदलून ही झाडे वाचवू शकते. कोस्टल रोड नॉर्थ प्रकल्पाच्या बाबतीतही असेच आहे, जिथे मार्गात थोडा बदल केल्यास नाना-नानी पार्कमधील १९९ झाडे वाचू शकतात. आपण भीषण उष्णतेचा सामना करत असताना अधिकारी आणि राजकारण्यांनी शहराच्या हरित आच्छादनाचे महत्त्व ओळखले पाहिजे. झाडे हे नैसर्गिक संरक्षक आहेत."