होळी, धूलिवंदन आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आणि शहरातील शांतता राखण्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. १२ मार्च ते १८ मार्च दरम्यान काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मुंबईचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी याबाबत आदेश जारी केला आहे.
महत्त्वाचे निर्बंध:
- आक्षेपार्ह घोषणा आणि अश्लिल गाण्यांवर बंदी – सार्वजनिक ठिकाणी अश्लील शब्द, आक्षेपार्ह घोषणा किंवा बिभत्स गाणी म्हणण्यास मनाई असेल. अशा कृत्यांमध्ये सहभागी होणाऱ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
-आक्षेपार्ह हावभाव आणि चिन्हांवर बंदी – नागरिकांना अयोग्य किंवा आक्षेपार्ह हावभाव करणे, आक्षेपार्ह चिन्हांचे प्रदर्शन करणे, इतरांचा अवमान होईल असे फोटो, फलक किंवा अन्य वस्तूंचे जाहिररित्या प्रदर्शन करण्यास बंदी.
-पादचारी व्यक्तींवर रंग, पाणी फेकण्यास मनाई – कोणत्याही व्यक्तीच्या संमतीशिवाय त्यांच्यावर रंग किंवा रंगाचे पाणी फेकण्यास सक्त मनाई असेल.
- पाण्याचे फुगे फेकण्यावर बंदी – रंग किंवा साध्या पाण्याने भरलेले फुगे, पिशव्या फेकण्यास बंदी घालण्यात आली आहे.
उल्लंघन केल्यास कारवाई -
या आदेशानुसार, कोणतीही व्यक्ती या निर्बंधांचे उल्लंघन करताना आढळल्यास किंवा उल्लंघनास मदत करत असल्यास, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम १३५ अंतर्गत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, हे निर्बंध शांततापूर्ण आणि सुसंस्कृत उत्सव सुनिश्चित करण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. नागरिकांनी इतरांच्या हक्कांचा आदर राखत जबाबदारीने सण साजरा करावा आणि सार्वजनिक ठिकाणी शिस्त राखावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पोलीस सार्वजनिक ठिकाणी सतत नजर ठेवणार असून, कोणत्याही गैरप्रकारावर तत्काळ कारवाई केली जाईल.