Photo : X
मुंबई

वाहतूककोंडीने 'मेगाहाल'; Mumbai Pune Expressway वर गॅस गळतीमुळे २८ तासांपासून वाहतूक ठप्प

‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने गेल्या २८ तासांपासून या मार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी निर्माण झाली. सुमारे २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असून हजारो प्रवासी २४ तासांहून अधिक काळ आपल्या वाहनात अन्नपाण्यावाचून अडकले आहेत.

Swapnil S

मुंबई/पुणे : ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’वर मंगळवारी सायंकाळी आडोशी बोगद्याजवळ प्रोपलेन गॅस वाहून नेणारा टँकर उलटल्याने भीषण अपघात झाला आणि त्यानंतर गेल्या २८ तासांपासून या मार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी निर्माण झाली. गॅस गळतीमुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाल्याने सुमारे २५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या असून हजारो प्रवासी २४ तासांहून अधिक काळ आपल्या वाहनात अन्नपाण्यावाचून अडकले आहेत. प्रशासनाकडून वाहतूक पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असले तरी अख्खा एक दिवस उलटून गेला तरी त्यांना यश आलेले नाही. एकाच जागी हजारो वाहने २० तासांपेक्षा जास्त वेळ उभी राहिल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.

मुंबई-पुणेयशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर रायगड जिल्ह्यातील आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ५.१० वाजण्याच्या सुमारास एका तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. टँकरमधील अतिशय ज्वालाग्राही प्रोपलेन गॅसची गळती सुरू झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, वाहतूक सुरळीत होण्यासाठी गुरुवारची सकाळ उजाडण्याची शक्यता आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी मुंबईकडे जाणारी वाहतूक तातडीने थांबवली, मात्र गॅस गळती पूर्णपणे थांबवता न आल्याने हा टँकर रस्त्यावरून हटवणे आव्हानात्मक बनले होते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, अग्निशमन दल व विविध सुरक्षा यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. रात्री उशिरापर्यंत लिकेज बंद करण्याचे प्रयत्न सुरू होते; मात्र सकाळपर्यंत त्यात यश आले नाही. बुधवारी सकाळी पुन्हा नव्याने तज्ज्ञ, इतर पथके दाखल होऊन गॅस लिकेज रोखण्याचे काम सुरू करण्यात आले. अखेर दुपारी तीननंतर गॅस दुसऱ्या टँकरमध्ये वर्ग करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.

या अपघातानंतर गॅस लिकेज रोखण्यासाठी एनडीआरएफ, बीपीसीएल, एचपीसीएल, दीपक फर्टिलायझर, हेल्प फाउंडेशन, टाटा अग्निशमन, देवदूत यंत्रणा, खोपोली व खालापूर अग्निशमन दल, महामार्ग पोलीस, डेल्टा फोर्स, आयआरबी आदी विविध यंत्रणा घटनास्थळी कार्यरत आहेत. बुधवारी सायंकाळी चारनंतर सदर अपघातग्रस्त टँकरमधील गॅस दुसऱ्या टँकरमध्ये वर्ग करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुपारपासून मुंबईच्या दिशेने जाणारी एक लेन पुणे मार्गिकेवरून सुरू करण्यात आली आहे. असे असले तरी वाहतूक सुरळीत होण्यासाठी गुरुवार सकाळपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.

टोल आकारू नये - राज्यमंत्र्यांचे आश्वासन

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर मंगळवारपासून वाहतूककोंडी झाली असली तरी प्रवाशांकडून टोल वसुली केली जात असल्याने लोकांनी संताप व्यक्त केला. प्रवाशांचे हाल होत असून राज्य सरकारकडून टोल वसुली थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वाहतूक सुरळीत होईपर्यंत टोल वसूल करू नये, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी दिले.

एसटी बससेवेलाही फटका

या महाकोंडीचा मोठा फटका महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवेलाही बसला असून, मुंबई-पुणे दरम्यान धावणारी प्रीमियम ‘शिवनेरी’ बस सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, ई-शिवनेरीच्या ७३ आणि इतर ६६ अशा एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत, तर महामंडळाची १६३ वाहने या कोंडीत अडकली आहेत. यामुळे स्वारगेट आणि इतर बस स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी झाली असून प्रवाशांचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला संताप व्यक्त केला असून प्रशासनाकडून वेळेत माहिती मिळत नसल्याची तक्रारही केली आहे.

प्रवाशांना मनस्ताप अन् संताप

दरम्यान, एक्स्प्रेस वे बंद असल्याने सर्व वाहने मुंबई–पुणे राष्ट्रीय महामार्गावर वळविण्यात आली. त्यामुळे त्या मार्गावरही अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. अनेक प्रवासी रस्त्यावरच अडकून पडले. पिण्याचे पाणी, अन्न व स्वच्छतागृहांची व्यवस्था नसल्याने प्रवाशांना उपाशीपोटी व अत्यंत गैरसोयीच्या परिस्थितीत तासन्‌तास थांबावे लागले. सकाळपर्यंत अपघाताची नेमकी माहिती न मिळाल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण होते.

Jharkhand Student Protest : भरती परीक्षांविरोधात आंदोलन; बॅरिकेड्स तोडून हजारो विद्यार्थ्यांचा विधानसभेवर मोर्चा, Video

प्रवाशांसाठी मोठी सोय; आता Cityflo ॲपवरून बुक करा मुंबई अन् दिल्ली मेट्रोचे QR तिकीट

युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला; १२ जणांचा मृत्यू, ३९ जखमी, Video

पतीचा शोध घेत फ्लॅटवर पोहोचली, दुसऱ्या महिलेसोबत पाहताच राडा; दोघींची तुफान हाणामारी, VIDEO

Independence Day 2026 : स्वातंत्र्यदिनासाठी दिल्ली मेट्रोचा खास अंदाज; 'हर घर तिरंगा' थीमवर साकारली विशेष ट्रेन