मुंबई: विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रातील मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात आता ‘कुलपती पदक’ प्रदान करण्यात येणार आहे. राज्यपाल तथा राज्य विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात येत असलेल्या या उपक्रमासाठी राज्यपालांच्या हस्ते तिन्ही विद्यापीठांच्या कुलगुरूंना प्रत्येकी १० लाख रुपयांचा प्रातिनिधिक धनादेश बुधवारी लोकभवन, मुंबई येथे प्रदान करण्यात आला.
या वेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ‘इन्स्टिट्यूट ऑफ हायर अँड डिजिटल लर्निंग : इंडस्ट्री-अकॅडेमिया कोलॅबोरेशन फॉर इम्प्रूव्हिंग एम्प्लॉयेबिलिटी’ या उपक्रमाचाही शुभारंभ करण्यात आला.
‘कुलपती पदक’ हे केवळ शैक्षणिक गुणवत्तेपुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्वाची, नेतृत्वगुणांची, नवोन्मेषाची, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील कामगिरीची, सामाजिक बांधिलकीची आणि विद्यापीठासाठीच्या विशेष योगदानाची दखल घेणारे असावे, अशी अपेक्षा राज्यपालांनी व्यक्त केली आहे. पदकासाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी विद्यापीठांनी पारदर्शक आणि गुणवत्ताधिष्ठित निकष निश्चित करावेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विद्यार्थ्यांमध्ये निकोप स्पर्धेची भावना निर्माण करून त्यांना अधिक उंच ध्येय निश्चित करण्यास आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रेरित करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे. ‘कुलपती पदक’ हे वर्गखोली, प्रयोगशाळा, क्रीडांगण, रंगमंच, समाजसेवा आणि नवोन्मेष अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेचे प्रतीक ठरावे, अशी राज्यपालांची भूमिका असल्याचे राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे यांनी सांगितले.
अभ्यासक्रम, कौशल्य विकास, इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, संशोधन आणि नवोन्मेष यांचा उद्योग व अर्थव्यवस्थेच्या गरजांशी मेळ घालण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, डेटा अॅनालिटिक्स, रोबोटिक्स, सायबर सुरक्षा, क्लाऊड कम्प्युटिंग आणि हरित तंत्रज्ञान यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची मूलभूत माहिती असावी, यावरही त्यांनी भर दिला.
सामाजिक उपक्रमांत सक्रिय सहभाग घ्यावा
राज्यपालांनी महाराष्ट्रातील विद्यापीठांच्या सहभागासाठी क्षयरोगमुक्त महाराष्ट्र अभियान, नशामुक्त भारत अभियान तसेच महाराष्ट्रातील लोप पावत चाललेल्या कला व पारंपरिक वारशाचे जतन आणि पुनरुज्जीवन हे तीन महत्त्वपूर्ण उपक्रमही पुढे आणले आहेत. विद्यापीठे ही केवळ शिक्षणाची केंद्रे नसून समाजाप्रती त्यांची व्यापक जबाबदारी आहे.