मुंबई : मुंबई व शहर परिसराला शुक्रवारी जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस पडत होता. शनिवारी सकाळपर्यंत भारतीय हवामान खात्याने मुंबईसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. तर पुढील तीन दिवस शहरात मध्यम पावसाची शक्यता आहे.
संपूर्ण कोकण पट्टयात शुक्रवारी जोरदार पावसासाठी 'ऑरेंज अलर्ट' देण्यात आला होता. ज्यात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरीचा समावेश होता. पुढील तीन दिवसांत मुंबई आणि ठाणे वगळता उर्वरित तीन जिल्ह्यांसाठी जोरदार पावसाचा 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याने हवामानातील अचानक बदलाचे कारण चक्रीवादळीय हवामान प्रणाली असल्याचे सांगितले.
स्थानिक हवामान अंदाजानुसार, पुढील २४ तास मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आकाश ढगाळ राहील, जोरदार सरींसह अतिजोरदार पावसाची शक्यता असून सायंकाळ रात्रीच्या सुमारास वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो.
आतापर्यंत मुंबईत सरासरी वार्षिक पावसाच्या ८७.३५ टक्के पावसाची नोंद झाली आहे. शुक्रवारी कुलाबा वेधशाळेत ३२ मिमी तर सांताक्रुझ वेधशाळेत ७७ मिमी पावसाची नोंद झाली.
महाराष्ट्रातील उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाडा या भागांसाठीदेखील जोरदार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.