मुंबई : आजारी वडिलांना भेटण्यासाठी पत्नी शिल्पा शेट्टीसोबत लंडनला जाण्याची परवानगी द्या. अशी विनंती करत व्यावसायिक राज कुंद्रा याने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर आर भोसले यांच्या खंडपीठाने दखल घेत सुनावणी दोन आठवड्यांनी घेण्याचे निश्चित केले.
दाम्पत्याच्या याचिकेनुसार, १० नोव्हेंबर रोजी कुंद्रा यांच्या वडिलांमध्ये दीर्घकालीन आणि कारण अस्पष्ट असलेली आयर्न-अॅमोनिया कमतरता आढळली, ज्यामुळे गंभीर गुंतागुंत आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी त्यांना पुन्हा एकदा कॅप्सूल एंडोस्कोपी किंवा डबल-बॅलून एंटरॉस्कोपी करण्याचा सल्ला दिला आहे. याचिकेत म्हटले आहे की त्यांना वारंवार श्वास घेण्यास त्रास होत आहे आणि त्यांची प्रकृती खालावत चालली आहे. या जोडप्याने २० जानेवारी २०२६ पर्यंत लंडनला जाण्याची परवानगी मागितली आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्याविरुद्ध ६० कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात लूकआऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. १४ ऑगस्टला जुहू पोलीस ठाण्यात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांच्याविरुद्ध व्यापारी दीपक कोठारी यांनी तक्रार दाखल केली आहे. त्या गुन्ह्यात पोलिसांनी दोघांविरोधात लूकआऊट नोटीस जारी केली केली.
दरम्यान, कुंद्रा याने गुन्हा रद्द करावा अशी विनंती करणारी याचिका दखल केली आहे. ती न्यायालयात प्रलंबित असल्याने त्याने आजारी वडिलांना लंडन येथे भेटायला जाण्यासाठी परवानगी द्यावी तसेच लूकआऊट नोटीस रद्द करण्यात यावी, अशी मागणी करत ॲड. प्रशांत पाटील यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मंगळवारी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती आर. आर. भोसले यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी घेण्यात आली. न्यायालयाने याचिका दाखल करून घेत याचिकेवर १६ डिसेंबरला सुनावणी निश्चित केली.