मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयात आता सिंगापूर दुबईच्या धर्तीवर पाण्याखाली समुद्र सफारीचा थरार अनुभवयास मिळणार आहे.
प्राणीसंग्रहालयात आंतरराष्ट्रीय दर्जाचे भूमिगत बोगदे साकारण्यात येत असून ६२ कोटी रुपये खर्चून १४ व ३६ मीटर लांब दोन टनेल असणार आहेत. या टनेल मध्ये देशी विदेशी प्रजातीच्या सागरी जीव पर्यटकांचे आकर्षण ठरेल. भूमिगत आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्सालयाचे ५० टक्के काम पूर्ण झाले असून मार्च २०२७ पर्यंत हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी दिले.
भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालयास दररोज ७ ते ८ हजार पर्यटक भेट देतात. सुट्टीच्या दिवशी तर पर्यटकांचा आकडा २० हजारांच्या घरात जातो. प्राणीसंग्रहालयातील पेंग्विन पर्यटकांचे आकर्षण ठरत असून भूमिगत मत्स्यालय पर्यटकांच्या पसंतीस उतरले, असा विश्वास राणी बाग प्राणीसंग्रहालयाचे संचालक डॉ संजय त्रिपाठी यांनी व्यक्त केला.
राणी बागेत सुमारे ५,५०० चौरस फुटांवर अत्याधुनिक मत्स्यालय उभारले जात आहे. मत्स्यालयात दोन भव्य अॅक्रेलिक टनेल उभारण्यात येत आहेत. यापैकी १४ मीटर लांबीचा टनेल रंगीबेरंगी प्रवाळ माशांसाठी, तर ३६ मीटर लांबीचा दुसरा टनेल खोल समुद्रातील दुर्मीळ प्रजातींसाठी असेल. या टनेलमधून चालताना पर्यटकांना १८० ते ३६० अंशांपर्यंत दृश्य अनुभवता येणार असून आपण समुद्राच्या गर्भात फिरत असल्याचा थरार अनुभवता येणार आहे.
दरम्यान, आयुक्त भिडे यांनी राणीबागेतील पेंग्विन कक्ष विस्तार प्रकल्पाचाही गुरुवारी आढावा घेतला. सध्या २१ पेंग्विन असलेल्या या प्रकल्पाची क्षमता ४० पेंग्विनपर्यंत वाढविण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे २०० चौरस मीटर क्षेत्राची वाढ करण्यात येत असून विद्यमान १,८०० चौरस फुटांच्या परिसरात आणखी ८०० चौरस फुटांची भर पडणार आहे.
जलचरांचे दर्शन
या मत्स्यालयात ४६ ते ७० विविध सागरी प्रजाती ठेवण्यात येणार आहेत. समुद्री जीवांसाठी आवश्यक असलेली पाण्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी १० लाख लिटर क्षमतेची अत्याधुनिक 'लाईफ सपोर्ट सिस्टीम' बसविण्यात येत आहे. लहान मुलांसाठी विशेष 'पॉप-अप विंडो'ची सुविधा असेल. तसेच चार चौकोनी, पाच वर्तुळाकार आणि दोन अर्धवर्तुळाकार टाक्यांमधून विविध जलचरांचे दर्शन घडणार आहे.