मुंबई : खड्डेमुक्त रस्त्यांसाठी सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यांची दोन टप्प्यात कामे सुरू आहेत. मात्र, सीसी रस्तेकामात निकृष्ट दर्जा, दिरंगाई यामुळे कंत्राटदारांना तब्बल ५५ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. ज्या प्रमाणात दंड ठोठावला त्या तुलनेत वसुली फक्त २३ कोटी ८२ लाखांची करण्यात पालिकेच्या रस्ते विभागाला यश आले आहे.
मुंबईत ७१२ किमीचे २ हजार १७५ रस्ते आहेत. मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरणाचे आदेश दिले होते. शिंदे यांच्या आदेशानंतर मुंबई महापालिकेने दोन टप्यात कंत्राटदारांच्या माध्यमातून सीसी रस्त्यांची कामे हाती घेतली आहेत.
मात्र, रस्तेकामात निकृष्ट दर्जाचे काम, कामात दिरंगाई असा ठपका ठेवत ५५ कोटींचा दंड ठोठावला. पहिल्या टप्प्यातील कामात कंत्राटदाराला आतापर्यंत ४८ कोटी ६४ लाख रुपये दंड झाला असून १९ कोटी ४ लाख रुपये दंड वसूल केला आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामात ६ कोटी ४६ लाख रुपये दंड झाला असून ४ कोटी ७८ लाख रुपये दंड वसुली केली आहे. परंतु दोन्ही टप्प्यातील कंत्राटदाराकडून ३१ कोटी २८ लाख रुपये दंड वसूल करणे बाकी आहे.
पहिल्या टप्प्यात ८९, तर दुसऱ्या टप्प्यात ७३ टक्के कामे पूर्ण
मुंबईत ७१२ किलोमीटर लांबीचे २ हजार १७५ रस्ते आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ३२४.९१ किलोमीटरचे ७३३ रस्ते आणि दुसऱ्या टप्प्यात ३८८ किलोमीटरचे १ हजार ४४२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. पहिल्या टप्प्यात पश्चिम आणि पूर्व उपनगरातील २८९ किलोमीटरच्या ६९४ हून अधिक रस्त्यांचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून एकूण सरासरी ८९ टक्के काम पूर्ण झाले आहे तर दुसऱ्या टप्प्यात शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील मिळून ३८८ किलोमीटरच्या १ हजार ४४२ रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. आतापर्यंत २८२ किलोमीटरहून अधिक १ हजार २०३ रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून ही सरासरी ७३ टक्के आहे.